मुंबईच्या वेगाला नवी झेप: ६० किमीचा कोस्टल रोड
वर्सोवा-भाईंदर प्रवास अवघ्या २० मिनिटांत! बीएमसीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग
मुंबई | प्रतिनिधी : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान, सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प वेगाने पुढे जात आहे. सुमारे ६० किमी लांबीच्या या मेगा प्रकल्पामुळे सध्या ९० ते १२० मिनिटे लागणारा वर्सोवा ते भाईंदर प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
७ पॅकेजमध्ये उभा राहणार संपूर्ण कॉरिडॉर
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचे बांधकाम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता (DBLR) अशा एकूण सात पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डबल एलिव्हेटेड रोड, खारफुटी क्षेत्रात खांबांवरील रस्ता, २ केबल-आधारित पूल, ४ बास्केट पूल, सुमारे १५ मीटर व्यासाचे २ जुळे बोगदे आणि १० आंतरबदल उभारले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईचा संपूर्ण किनारपट्टी भाग परस्परांशी जोडला जाणार आहे.
३.९ किमीच्या बोगद्याने जोडले जाणार मालाड-चारकोप
पॅकेज सीमध्ये माईंडस्पेस, मालाड ते चारकोप खाडी दरम्यान उत्तर दिशेने जाणारा ३.९ किमी लांबीचा बोगदा उभारण्यात येणार आहे. तर पॅकेज डीमध्ये चारकोप खाडी ते माईंडस्पेस, मालाड दरम्यान दक्षिण दिशेने जाणाऱ्या ३.९ किमी लांबीच्या जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे. बांगर यांनी दोन्ही पॅकेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
चारकोपमध्ये ६५ बाय ४० मीटर जागेत शाफ्टचे काम
चारकोप येथे बोगदा बांधकामासाठी शाफ्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी ६५ मीटर x ४० मीटर क्षेत्रात खोदकाम सुरू झाले आहे. सध्या पायलिंगचे काम सुरू आहे. बोगदा खणन यंत्राचे (TBM) सुटे भाग डिसेंबर २०२६मध्ये उपलब्ध होणार असून त्यानंतर सुमारे दोन महिन्यांत TBMची जुळवाजुळव (असेंबली) पूर्ण करून बोगद्याचे खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.

दुसऱ्या TBMच्या असेंबलीनंतर दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम
दुसऱ्या बोगदा खणन यंत्राची (TBM) जुळवाजुळवही निर्धारित कार्यक्रमानुसार पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू केले जाईल. दोन्ही दिशांच्या बोगद्यांच्या बांधकामाला गती देण्यावर भर देण्यात आला आहे.
मुंबईचा किनारपट्टी भाग जोडणारा महत्त्वाचा कॉरिडॉर
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा केवळ एक रस्ता नसून शहराच्या किनारपट्टी भागांना वेगवान आणि अखंड वाहतूक नेटवर्कशी जोडणारा महत्त्वाचा कॉरिडॉर ठरणार आहे. वर्सोवा-भाईंदर जोडणी मजबूत झाल्यामुळे पश्चिम मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतूक कोंडीवरील दबावही कमी होण्याची अपेक्षा आहे.
‘काम दर्जेदार हवे; निर्धारित मुदतीतच पूर्ण झाले पाहिजे’
अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना कोस्टल रोडची सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे स्पष्ट केले. पाहणीवेळी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मांतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता वैभव गांधी, संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.
