वरळी मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ६३ टक्के पूर्ण; मुदतीत कामासाठी मनुष्यबळ वाढवा!
३० सप्टेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य; स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत कामांना गती देण्याचे अभिजीत बांगर यांचे निर्देश

दररोज ५०० दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया; समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणार
विशेष प्रतिनिधी मुंबई :
मुंबईच्या सागरी पर्यावरणाचे संरक्षण आणि समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वरळी मलजल प्रक्रिया केंद्राचे काम ६३ टक्के पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवून स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकीची कामे वेगाने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. दररोज सुमारे एक हजार कामगार कार्यरत असतानाही प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी मनुष्यबळ आणि साहित्य पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या प्रकल्पाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२७ निश्चित करण्यात आली आहे.
मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे हे केंद्र उभारण्यात येत आहे. बांगर यांनी प्रकल्पस्थळाला भेट देऊन विविध प्रक्रिया टाक्या, पंप हाऊस, इनलेट-आउटलेट व्यवस्था, गाळ प्रक्रिया यंत्रणा, अंतर्गत पाइपलाइन तसेच यांत्रिकी आणि विद्युत कामांची पाहणी केली. प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत त्यांनी कामांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत गती आणण्याच्या सूचना दिल्या.
आठ महिन्यांच्या कामाचे काटेकोर नियोजन करा
ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांच्या कालावधीत उपलब्ध मनुष्यबळ, आवश्यक साहित्याचा पुरवठा आणि विविध कामांचा टप्पानिहाय आराखडा यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. जुन्या इमारतींचे पाडकाम आणि नवीन इमारतींचे बांधकाम एकामागोमाग करण्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या ठिकाणी दोन्ही कामे समांतरपणे हाती घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वेळेची बचत होऊन प्रकल्पाच्या कामाला गती मिळू शकेल.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एका उदंचन केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. हे केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची सूचनाही बांगर यांनी केली. कामांचा वेग वाढवताना गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेशी तडजोड करू नये, असेही त्यांनी बजावले.

५०० एमएलडी मलजलावर प्रक्रिया; २५० एमएलडीवर तृतीय स्तरीय प्रक्रिया
या प्रकल्पात आधुनिक मेम्ब्रेन बायो रिऍक्टर (एमबीआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. दररोज ५०० एमएलडी मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया, तर त्यापैकी २५० एमएलडी मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. गाळावर वर्ग ‘अ’ स्तरापर्यंत प्रक्रिया करण्यासोबतच निर्माण होणाऱ्या बायोगॅसपासून वीज निर्मितीही करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेमुळे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या मलजलाचा पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यास, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास आणि सागरी जीवसृष्टीच्या संवर्धनास मदत होणार आहे.
फोर्टपासून वरळीपर्यंतच्या परिसराला लाभ
वरळीतील या प्रकल्पाचा लाभ फोर्ट, भायखळा, पेडर रोड, गावदेवी, हाजी अली, प्रभादेवी, दादर आणि वरळी परिसरातील नागरिकांना होणार आहे. मुंबईतील सांडपाण्यावर अधिक प्रभावी प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
नवीन केंद्र उभारताना जुन्या केंद्राचे काम सुरूच
नवीन मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम सुरू असतानाही वरळीतील विद्यमान केंद्राचे प्रचालन आणि परिरक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. सध्या या केंद्रात मलजलावर स्क्रीनिंग आणि डिग्रिटिंग ही प्राथमिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर मलजल खोल समुद्रात सोडले जाते.
या पाहणीवेळी उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेंद्र परब तसेच संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.