मुंबईत ६९.५५ किमी रस्त्यांची स्वच्छता; १५४.७५ टन धूळ-राडारोडा हटविला
वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम; २९ मार्गांवर स्वच्छता, ५४१ कर्मचारी आणि ४७१ स्वयंसेवक तैनात

प्रतिनिधी/मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम-पाडकामाचा राडारोडा हटविण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी ६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यातून ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम-पाडकामाचा राडारोडा, असा एकूण १५४.७५ टन कचरा संकलित करण्यात आला. २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांमधील १४६ रस्त्यांवर स्वच्छता आणि धूळ नियंत्रणाची कामे केली जात आहेत.

प्रमुख वाहतूक मार्गांवर विशेष लक्ष
मुंबईतील वर्दळीचे आणि धूळप्रवण रस्ते या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत. वांद्रे-कुर्ला जोडमार्ग, सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोडमार्ग, घाटकोपर-मानखुर्द मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, लिंक रोड, कार्टर रोड आणि शीव-मानखुर्द मार्गांसह विविध प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता केली जात आहे.
धूळ हवेत पसरण्यापासून रोखण्यावर भर
रस्त्यांची झाडलोट, स्क्रॅपिंग, कडेला साचलेली धूळ आणि गाळ हटविणे, दुभाजक व पदपथांची स्वच्छता, तसेच धूळप्रवण ठिकाणी पाण्याची फवारणी आणि मिस्टिंग अशा उपाययोजना केल्या जात आहेत. यांत्रिक स्वच्छतेसोबतच मनुष्यबळाचाही वापर करण्यात येत आहे. संकलित कचरा तातडीने उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यावर भर दिला जात आहे.

१८ जेसीबी, २१ स्वीपरसह यंत्रसामग्रीचा वापर
या मोहिमेसाठी ५४१ स्वच्छता कर्मचारी आणि ४७१ स्वयंसेवक कार्यरत होते. स्वच्छतेसाठी १८ जेसीबी, २० डंपर, २१ मल्टीपर्पज मिस्टिंग मशीन, २१ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, सहा वॉक-बिहाइंड ई-स्वीपर आणि सहा दुभाजक स्वच्छता मशीनचा वापर करण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईतील रस्त्यांवरील धूळ कमी करून वायुगुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने ६ नोव्हेंबरपर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे.