दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली
झाडावर अडकल्याने वाचला जीव, 26 वर्षीय तरुणी गंभीर जखमी
प्रतिनिधी/मुंबई
भांडुप पश्चिमेतील तुशेतपाडा परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार, सनशाइन बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून 26 वर्षीय महिलेने उडी घेतली. खाली पडताना ती इमारतीलगतच्या झाडावर अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत तिची सुटका केली.
बुधवारी सकाळी सुमारे 9.32 वाजता ही घटना घडली. घटनेच्या प्राथमिक माहितीत महिलेने दहाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचे नमूद आहे. उडी घेतल्यानंतर ती सुमारे 20 ते 25 फूट उंचीवर असलेल्या झाडावर अडकून लटकत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम मजल्यावरून हुक लॅडरच्या सहाय्याने झाडाजवळ पोहोचत तिची सुखरूप सुटका केली.
त्यानंतर तिला खासगी रुग्णवाहिकेतून अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, महिलेच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. पुढील उपचारांसाठी तिला एलटीएमजी सायन रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
महिलेने उडी घेतल्याचे अग्निशमन दलाच्या प्राथमिक माहितीसह रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीतही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपलब्ध माहितीनुसार ही महिला खिडकीतून उडी घेतल्याचे स्पष्ट होते; मात्र तिने हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.