मुसाफिरखाना, साबू सिद्दिक मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई; ५२ अनधिकृत स्टॉल्स हटवले
दोन दिवसांत १४४ स्टॉल्सवर कारवाई; ‘पादचारी प्रथम’ मोहिमेंतर्गत महापालिकेची अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम

विशेष प्रतिनिधी मुंबई :
मुंबईतील पादचाऱ्यांसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. साबू सिद्दिक मार्ग, मुसाफिरखाना आणि मनीष मार्केट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करत ५२ अनधिकृत स्टॉल्स हटवण्यात आले. याआधी बुधवारी याच परिसरात ९२ स्टॉल्सवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसांत एकूण १४४ अनधिकृत स्टॉल्स हटवण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील ‘पादचारी प्रथम’ मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ताडपत्री, बांबू, लोखंडी पाइप आणि पत्र्यांच्या साहाय्याने उभारलेली तात्पुरती बांधकामे तसेच पक्क्या स्वरूपाचे लोखंडी स्टॉल्सही हटवण्यात आले. रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे दूर करून पादचाऱ्यांना मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
लोकप्रतिनिधींच्या पाहणीनंतर कारवाईला वेग
१३ ऑक्टोबर रोजी लोकप्रतिनिधींसमवेत साबू सिद्दिक मार्ग आणि मुसाफिरखाना परिसराची पाहणी करण्यात आली होती. या वेळी अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर १४ ऑक्टोबरला ९२ आणि १५ ऑक्टोबरला आणखी ५२ स्टॉल्सवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांच्या आदेशानुसार आणि परिमंडळ-१ च्या उपआयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली. ए विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी या कारवाईत सहभागी झाले.
पोलिसांचा बंदोबस्त
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे पाच फौजदार आणि दहा पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाने सलग दोन दिवस कारवाई करत या परिसरातील अनधिकृत स्टॉल्स हटवले.