शिवाजी पार्कमध्ये मराठमोळ्या रास-दांडियाचा जल्लोष; दररोज दीड हजार तरुण-तरुणींचा सहभाग
मुंबई आणि उपनगरांत गरबा आयोजनातून दरवर्षी ४५० कोटींची उलाढाल

विशेष प्रतिनिधी | मुंबई :
मराठी परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित मराठमोळ्या रास-दांडियाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्ट आणि समाधान सरवणकर फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात दररोज एक ते दीड हजार तरुण-तरुणी सहभागी होत आहेत. पारंपरिक दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी तरुणाईला संस्कृती जपण्याची संधी
मराठी भाषिक तरुण-तरुणींनाही रास-दांडियामध्ये सहभागी होता यावे आणि त्यांचे आपल्या परंपरा व संस्कृतीशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने समाधान सरवणकर फाउंडेशन गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून मराठी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासोबतच तरुणाईला पारंपरिक उत्सवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आयोजक चेतन राणे यांनी दिली. १९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या रास-गरब्याच्या शेवटच्या दिवसांत तरुण-तरुणींची उपस्थिती वाढत आहे.

गरबा आयोजनातून दरवर्षी ४५० कोटींची उलाढाल
मुंबई आणि उपनगरांत दरवर्षी गरबा आयोजनाच्या माध्यमातून सुमारे ४५० कोटी रुपयांची उलाढाल होते. यामध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणा, मंडप उभारणी, सजावट तसेच कपड्यांच्या व्यवसायाचा मोठा वाटा असतो. गरबा आणि दांडिया हे केवळ सांस्कृतिक उत्सव राहिले नसून स्थानिक व्यापार आणि रोजगाराला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम बनले आहेत. या आयोजनांमुळे विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात काम मिळत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही हातभार लागत आहे.