चेंबूर झाड दुर्घटनेची नव्याने सखोल चौकशी; महापौरांच्या भूमिकेनंतर तज्ज्ञ समितीची नियुक्ती
प्राथमिक अहवाल फेटाळल्यानंतर प्रशासनाची मोठी कारवाई; माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख एका महिन्यात सादर करणार अहवाल
मुंबई | प्रतिनिधी
चेंबूरमधील डायमंड उद्यानाजवळ शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आता नव्याने सखोल चौकशी होणार आहे. महापौर रितू तावडे आणि महानगरपालिका महासभेने प्राथमिक चौकशी अहवाल फेटाळल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने वनस्पतीशास्त्राचे तज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. संजय देशमुख यांची त्रयस्थ एकसदस्यीय चौकशी समिती म्हणून नियुक्ती केली आहे. समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३० जून रोजी चेंबूर येथील डायमंड उद्यानाजवळ पिंपळाचे जुने झाड शाळेच्या बसवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर चार विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर महानगरपालिकेने सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात दुर्घटनेची मूळ कारणे, जबाबदारी निश्चित करणे आणि कठोर कारवाईबाबत ठोस शिफारशी नसल्याचे निरीक्षण नोंदवत महापौर रितू तावडे आणि महासभेने तो अहवाल अमान्य केला होता. त्यानंतर स्वतंत्र तज्ज्ञामार्फत फेरचौकशीचे आदेश देण्यात आले होते.
नियुक्त समिती प्राथमिक चौकशीची कार्यपद्धती, सादर केलेले पुरावे, अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, जलनिःसारण, मृदाशास्त्र, हवामान आणि सार्वजनिक प्रशासन या विविध अंगांनी संपूर्ण प्रकरणाचा वैज्ञानिक अभ्यास करणार आहे. तसेच दुर्घटनेची मूळ कारणे शोधून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक धोरणात्मक सुधारणा आणि कठोर शिफारशीही अहवालात सुचविण्यात येणार आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने समितीला सर्व आवश्यक कागदपत्रे, स्थळभेटींसाठी सहकार्य आणि संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असून, या अहवालाकडे आता पालिका प्रशासनासह मुंबईकरांचेही लक्ष लागले आहे.