अण्णाभाऊंचे स्मारक नव्हे, तर जगाला समतेचा संदेश देणारे ज्ञानपीठ’; घाटकोपरात 300 कोटींच्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे भूमिपूजन
20 मीटर उंच कांस्य पुतळा, 'फकिरा'वरील जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प, UPSC-MPSC मार्गदर्शन केंद्र उभारणार; 'महायुती सरकार दिलेला शब्द पाळते' - एकनाथ शिंदे
‘
मुंबई | प्रतिनिधी
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 300 कोटी रुपयांच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे भूमिपूजन शुक्रवारी घाटकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ज्ञानपीठ आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे केंद्र ठरेल. महायुती सरकार दिलेला प्रत्येक शब्द पाळते आणि या प्रकल्पासाठी निधी कमी पडू देणार नाही.”
या प्रकल्पात 20 मीटर उंच कांस्य पुतळा, अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प, अत्याधुनिक ग्रंथालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, UPSC-MPSC मार्गदर्शन केंद्र, डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन आणि मुलांसाठी डिस्कव्हरी झोन उभारण्यात येणार आहे.
अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना त्यांनी साहित्याच्या माध्यमातून जनमानसात पोहोचवले. “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार महाराष्ट्राच्या विकासाचे तत्त्वज्ञान असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी वाटेगाव येथे 50 कोटी रुपयांच्या निधीतून अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्याची घोषणाही केली. राज्य सरकार विकासाबरोबरच सामाजिक न्याय, कौशल्य विकास आणि सर्वसामान्यांच्या सन्मानासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.