घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे काम मार्चअखेर पूर्ण करा
अभिजीत बांगर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; १ हजार मनुष्यबळ तैनात, ३१ डिसेंबरपर्यंत द्वितीय स्तरीय प्रक्रिया वाहिनीचे लक्ष्य

प्रतिनिधी/मुंबई :
समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया करून समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्राचे (एसटीपी) काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. घाटकोपर (पूर्व) येथील प्रकल्पस्थळी पाहणी करून त्यांनी स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांचा सविस्तर आढावा घेतला.
मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत ३३७ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचे हे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात सिक्वेन्शियल बॅच रिऍक्टर (एसबीआर) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर करण्याची सुविधा यामुळे उपलब्ध होणार असून, समुद्री प्रदूषण कमी करण्याबरोबरच सागरी पर्यावरण आणि जलचर जीवनाच्या संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर परिसरालाही या प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे.
प्रत्येक कामाचा बांगर यांनी घेतला आढावा
प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान बांगर यांनी विविध प्रक्रिया टाक्या, मलजलाची आवक-जावक व्यवस्था, पंप हाऊस, गाळ प्रक्रिया केंद्र, अंतर्गत पाइपलाइन आणि स्थापत्य कामांची प्रगती तपासली. तसेच पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग यंत्रणा, गाळ प्रक्रिया यंत्रणा, यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंगच्या कामांचीही पाहणी केली.
विद्युत कामांमध्ये ट्रान्सफॉर्मर, विद्युत पॅनेल, केबलिंग, मोटर्सना वीजपुरवठा, नियंत्रण व स्वयंचलन प्रणाली, एससीएडीए (SCADA) आणि बॅकअप वीज व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला.

३१ डिसेंबरपर्यंत महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक द्रव वाहिनीचे काम ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत, तर संपूर्ण प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने निश्चित केले आहे. हे वेळापत्रक पाळण्यासाठी प्रकल्पस्थळी मनुष्यबळ वाढविण्यात आले असून, १ ऑक्टोबरपासून सुमारे १ हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत हे अतिरिक्त मनुष्यबळ कायम ठेवण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.
प्रकल्पातील सर्व कामे एकमेकांवर अवलंबून न ठेवता समांतर पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करा. कामाचा वेग वाढविताना गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) राजेंद्र परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.