३५ हजार फुटांवर मृत्यूशी झुंज देत १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची महापौर रितू तावडे यांनी घेतली भेट
स्मित लवकर पूर्णपणे बरे व्हावेत”; घाटकोपरमध्ये जाऊन कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस
प्रतिनिधी/ मुंबई :
आकाशात तब्बल ३५ हजार फूट उंचीवर सहवैमानिकाच्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही अदम्य धैर्य आणि प्रसंगावधान राखत २७ बालकांसह १८० प्रवाशांचे प्राण वाचवणारे फ्लायदुबईचे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रविवारी भेट घेतली. घाटकोपर पूर्व येथील ‘धवलगिरी’ इमारतीतील कॅप्टन स्मित यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.
कॅप्टन स्मित यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती, उपचार आणि प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेबाबत महापौरांनी कुटुंबीयांकडून माहिती घेतली. स्मित मच्छार लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महापौरांनी सदिच्छा व्यक्त करत प्रार्थना केली.
स्वतःच्या प्रभागातील ‘शूर सुपुत्रा’च्या कुटुंबाला पाठबळ
मच्छार कुटुंबीयांचे निवासस्थान असलेला प्रभाग क्रमांक १३२ हा महापौर रितू तावडे यांनी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलेला प्रभाग आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील या शूर सुपुत्राच्या कुटुंबीयांची भेट घेऊन महापौरांनी केवळ वैयक्तिक सदिच्छा व्यक्त केली नाही, तर संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्या वतीने मच्छार कुटुंबीयांना पाठबळ दिले.
यावेळी आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

रक्ताच्या थारोळ्यातही विमान सुरक्षित उतरवले
३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात हा थरारक प्रसंग घडला. विमान सुमारे ३५ हजार फूट उंचीवर असताना सहवैमानिकाने केलेल्या चाकूहल्ल्यात कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी नियंत्रण गमावले नाही. अतुलनीय संयम आणि प्रसंगावधान दाखवत त्यांनी विमानाचे यशस्वी आपत्कालीन लँडिंग केले आणि विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचवले.
या अभूतपूर्व शौर्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर तावडे यांनी मच्छार कुटुंबीयांची भेट घेऊन कॅप्टन स्मित यांच्या धैर्याला सलाम केला आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
