प्रतिनिधी/मुंबई :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य करण्यात येणार असल्याचे तसेच मूर्ती तयार करण्यापासून मंडळाला डिलिव्हरी देईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवणे बंधनकारक असल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
एक टनापेक्षा अधिक वजनाच्या गणेशमूर्तींसाठीही कोणतेही फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले नाही. तसेच मूर्तीच्या जडणघडणीपासून वितरणापर्यंतची माहिती नोंदविण्याबाबतही महापालिकेने कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे समाजमाध्यमांवरील अशा संदेशांवर किंवा अपुऱ्या माहितीतून प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर गणेश मंडळांनी आणि भक्तांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
गणेशमूर्तींसंदर्भात अशा स्वरूपाचा कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नसून, त्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश अथवा निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ‘फिटनेस प्रमाणपत्र’ किंवा मूर्तीच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतची माहिती ठेवणे बंधनकारक असल्याच्या चर्चांना महापालिका प्रशासनाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.
मूर्तीच्या आगमनावेळी सुरक्षिततेला प्राधान्य
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनावेळी सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेश मंडळांनी मूर्तीच्या आगमन सोहळ्याचे नियोजन करताना पोलीस, वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाशी आवश्यक समन्वय साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेशोत्सव उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी गणेश मंडळांनी अफवांऐवजी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.