रुस्तमजी क्राऊनवर पालिकेचा हातोडा; ९ सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त प्रभादेवीतील रुस्तमजी क्राऊनमध्ये दोन दिवस धडक कारवाई;
१३८ सदनिकांना नोटिसा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ९ फ्लॅटमधील बांधकामे हटवली

मुंबई | प्रतिनिधी :
प्रभादेवी येथील उच्चभ्रू रुस्तमजी क्राऊन इमारतीतील अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महापालिकेने अखेर धडक कारवाई केली. मंजूर आराखड्याचे उल्लंघन तसेच एफएसआय नियमांचे उल्लंघन करून करण्यात आलेली बांधकामे आणि अंतर्गत फेरबदल हटवण्यासाठी २४ आणि २५ ऑगस्ट रोजी पालिकेने निष्कासन मोहीम राबवली. दोन दिवसांत तब्बल ९ सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
१३८ सदनिकांना नोटिसा
रुस्तमजी क्राऊन ही ३ तळघर, तळमजला आणि ६३ मजल्यांची इमारत आहे. यातील १ ते १२ मजले वाहनतळासाठी, १० व ११ वा मजला फिटनेस सेंटरसाठी, १३ वा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी, तर १४ ते ६३ मजले निवासी वापरासाठी आहेत. निवासी भागात A, B आणि C अशा तीन विंग आहेत. A आणि B विंगला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, दोन्ही विंगमध्ये प्रत्येकी १८६ सदनिका आहेत.
एफएसआय उल्लंघन, अनधिकृत बांधकामे आणि फेरबदलाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेने A आणि B विंगमधील संबंधित १३८ सदनिकांना नोटिसा बजावल्या. मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ तसेच MRTP Act, १९६६ अंतर्गत ही प्रक्रिया राबवण्यात आली.
सुनावणीची संधी; त्यानंतर कारवाई
नोटिसा बजावल्यानंतर संबंधित सदनिकाधारकांना कागदपत्रे, स्पष्टीकरण आणि म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. प्राप्त कागदपत्रे व उपलब्ध अभिलेखांची छाननी केल्यानंतर पात्र प्रकरणांमध्ये सकारण आदेश पारित करण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या सदनिकांवर २४ आणि २५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई करण्यात आली.
लॉबीपासून डक्ट-शाफ्टपर्यंत अनधिकृत विस्तार
कारवाईत अनधिकृत बांधकामाचे विविध प्रकार समोर आले. काही सदनिकांमध्ये सामाईक लॉबीचा भाग लाकडी साहित्य आणि सिपोरेक्स विटांनी बंदिस्त करून तो घराच्या वापरात आणण्यात आला होता.
काही ठिकाणी किचन डक्ट एम.एस. प्लेटने बंदिस्त करून स्वयंपाकघराचे क्षेत्र वाढवण्यात आले होते. तर व्हेंटिलेशन शाफ्ट बंदिस्त करून त्याचा वापर स्टोअर रूम म्हणून केला जात असल्याचे आढळले. काही सदनिकांमध्ये खोलीचा भाग सिपोरेक्स साहित्याने बंद करून तो स्वयंपाकघरात समाविष्ट करण्यात आला होता.
नोटिसा आणि सकारण आदेशानुसार अशा सर्व अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा चालवला.
१५ कामगार, ४ अभियंते आणि पोलिसांचा बंदोबस्त
कारवाई सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पालिकेने १५ कामगार, २ मुकादम, ४ अभियंते आणि ८ पोलीस कर्मचारी तैनात केले होते. नियुक्त निष्कासन कंत्राटदाराच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
पालिकेने स्पष्ट केले आहे की, उर्वरित पात्र प्रकरणांमध्येही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील निष्कासन कारवाई सुरू ठेवली जाणार आहे.