गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात
१.२६ किमीचा पूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज; दुसऱ्या आठवड्यात भारचाचणीl

मुंबई : प्रतिनिधी
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गातील महत्त्वाचा टप्पा आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. गोरेगाव ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानचा १.२६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले असून, सध्या रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, रस्त्यावरील थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट्स आयज आणि ध्वनीरोधक बसविण्याची कामे वेगाने सुरू आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळी पाहणी करून उर्वरित कामांचा आढावा घेतला. पुलाची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारचाचणी घेण्यात येणार असून, त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून १५ ऑक्टोबरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

१२.२० किमीच्या प्रकल्पामुळे प्रवास ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर
गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाची एकूण लांबी सुमारे १२.२० किलोमीटर आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, सध्याचा सुमारे ७५ मिनिटांचा प्रवास २५ मिनिटांपर्यंत कमी होण्यास मदत होईल. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे.
३१ खांब, ३० स्पॅन; ३ बाय ३ मार्गिका
दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान ३ बाय ३ मार्गिकांचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. दिंडोशी न्यायालयापासून सुरू होणारा हा पूल रत्नागिरी जंक्शन येथील हॉटेल परिसरात वळून दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो.
एकाच खांबावर पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटच्या सेगमेंटल बॉक्स गर्डरचा वापर करून पुलाची उभारणी करण्यात आली आहे. पुलासाठी ३१ खांब आणि ३० स्पॅन उभारण्यात आले आहेत. खांबांवर तुळई बसविणे, डेक स्लॅबचे ओतकाम तसेच दोन्ही बाजूंच्या पोहोच मार्गांचे काम पूर्ण झाले आहे.
पुलाखालील रस्ते मोकळे करण्याचे निर्देश
पाहणीदरम्यान बांगर यांनी पुलाखालील रस्त्यांवरील सर्व अडथळे तातडीने हटवून वाहतुकीसाठी रस्ते पूर्णपणे खुले करण्याचे निर्देश दिले. परिसरातील राडारोडा आणि घनकचरा हटवून स्वच्छता राखण्याबरोबरच पुलालगतच्या ७.५ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.
पुलाची अंतिम कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता नरेश मेघराजानी यांच्यासह महापालिकेचे अभियंते आणि सल्लागार यावेळी उपस्थित होते.