गोरेगाव-मुलुंड बोगदा प्रकल्पाला वेग; ‘तुळशी’ने ६४ मीटर खोदला बोगदा
दुसऱ्या ‘विहार’ टीबीएमची जोडणी ९२% पूर्ण; २२ ऑक्टोबरपासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू होणार
फेब्रुवारी २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य; सुरक्षितता आणि वेळापत्रकाला सर्वोच्च प्राधान्य
प्रतिनिधी/मुंबई, :
मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्याच्या कामाला वेग आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या पहिल्या बोगद्याचे ‘तुळशी’ टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) आतापर्यंत ६४ मीटर खोदकाम पूर्ण केले आहे. दुसऱ्या बोगद्यासाठीच्या ‘विहार’ टीबीएमची जोडणीही ९२ टक्के पूर्ण झाली असून, तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून दुसऱ्या बोगद्याचे प्रत्यक्ष खोदकाम सुरू करण्यात येणार आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून बोगदा खोदकामाची पद्धत, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता, बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
६४ मीटर खोदकाम; २७ कंकणाकृती कडे उभारले
‘तुळशी’ टीबीएम १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले. आतापर्यंत ६४ मीटर बोगदा खोदण्यात आला असून, या अंतरात बोगद्याच्या मजबुतीकरणासाठी २७ कंकणाकृती कडे उभारण्यात आले आहेत. याशिवाय दोन तात्पुरत्या कडांचीही उभारणी करण्यात आली आहे.
गोरेगाव पूर्वेतील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिमेतील अमरनगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली हे जुळे भूमिगत बोगदे बांधले जात आहेत.
दोन्ही बोगदे प्रत्येकी ४.७० किमीचे
प्रकल्पातील दोन्ही बोगदे एकमेकांना समांतर असून प्रत्येकी ४.७० किलोमीटर लांबीचे आणि तीन मार्गिकांचे आहेत. बोगद्याचा व्यास १४.२० मीटर असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात तो १३ मीटर राहणार आहे.
‘तुळशी’ हे सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक प्रकारातील टीबीएम आहे. त्याच्या कटरचा व्यास १४.४९ मीटर आणि संपूर्ण यंत्रणेची लांबी ८३ मीटर आहे. यामध्ये २२ मीटरचा शिल्ड भाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅकअप गॅन्ट्री आहे.
यंत्रणेत स्वयंचलित मलबा वाहतूक प्रणाली असून ३४० मीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे कठीण भूगर्भीय परिस्थितीतही मलबा वेगाने बाहेर काढण्यास मदत होत आहे.
‘विहार’ टीबीएम ९२% तयार; १३ ऑक्टोबरपासून चाचणी
पहिल्या बोगद्याचे खोदकाम सुरू असतानाच दुसऱ्या ‘विहार’ टीबीएमची प्रकल्पस्थळी जोडणी ९२ टक्के पूर्ण झाली आहे.
संपूर्ण यंत्रणा बसवल्यानंतर १३ ऑक्टोबरपासून साइट अॅक्सेप्टन्स टेस्ट (SAT) सुरू करण्यात येणार आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे.
कामाच्या प्रगतीवर ‘डॅशबोर्ड’द्वारे नजर
प्रकल्पाच्या कामकाजासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. यात कामाची टक्केवारी, दररोजचे खोदकाम, बोगद्याची सद्यस्थिती, अपेक्षित प्रगती, सुरक्षा आणि निर्धारित वेळापत्रक यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पाच्या कामात कोणत्याही कारणाने विलंब होऊ नये यासाठी मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामग्रीचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सुरक्षिततेशी तडजोड नको
बोगदा खोदकामाचे काम अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक असल्याने कामाचा वेग राखतानाच कामगार आणि अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे बांगर यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन, आवश्यक सुरक्षा साधनांची उपलब्धता आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारी २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील हा महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभाग, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंते यावेळी उपस्थित होते.