गणेशोत्सवाचे नियोजन जमले; आता वायू प्रदूषण रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’
आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश; १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान,
प्रतिनिधी/मुंबई
पावसाळा आणि गणेशोत्सवासाठी केलेल्या पूर्वतयारीच्या धर्तीवर आता मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठीही आगाऊ आणि प्रभावी नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. सध्या मुंबईचा वायू गुणवत्ता निर्देशांक नियंत्रणात असला तरी आगामी काळात तो वाढू नये, यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) विविध विभाग, खाती, प्रकल्प आणि उपक्रमांचा मासिक आढावा घेण्यात आला. या बैठकीत आयुक्तांनी वायू प्रदूषणासोबतच ‘पादचारी प्रथम’ अभियान, नागरिकांच्या तक्रारी, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि रखडणाऱ्या प्रकल्पांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
१ ते १५ ऑक्टोबर विशेष मोहीम
वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी महापालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी सांगितले. १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या बांधकाम व पायाभूत प्रकल्पांच्या परिसरात योग्य आवरण लावणे यासह आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
वायू गुणवत्ता निर्देशांक वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
‘पादचारी प्रथम’चे परिणाम दिसत आहेत; सातत्य ठेवा
मुंबईतील पदपथ अडथळामुक्त आणि नागरिकांसाठी सुलभ करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. या अभियानासाठी सुमारे ३०७ किलोमीटर लांबीचे २०० पदपथ निश्चित करण्यात आले आहेत.
या पदपथांवरील अडथळे दूर करून पादचाऱ्यांना मोकळा मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, केलेल्या कार्यवाहीत सातत्य ठेवून हे अभियान अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
‘मार्ग’वरील ८७ हजार तक्रारी; ६४ टक्के निकाली
नागरिकांच्या तक्रारी या महापालिकेच्या कामकाजाचे प्रत्यक्ष मूल्यमापन करणारे महत्त्वाचे माध्यम असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ‘मार्ग’ (Management and Redressal of Grievance) प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
मात्र, तक्रारी केवळ निकाली काढण्यापुरत्या मर्यादित न ठेवता ज्या स्तरावर त्यांचे निराकरण होणे अपेक्षित आहे, त्याच स्तरावर त्या तातडीने सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांकडून विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याचेही आयुक्तांनी सांगितले.
१३९ ‘बॉटलनेक’वर तोडगा काढा
मुंबईतील वाहतूक कोंडीची कारणे ठरणाऱ्या सुमारे १३९ ‘बॉटलनेक’ ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे. या ठिकाणांचा सखोल अभ्यास करून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बांधकामांबाबत नियमानुसार कारवाई करावी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी उपआयुक्तांची थेट जबाबदारी
रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या आदी क्षेत्रांतील विविध प्रकल्प महापालिकेकडून सुरू आहेत. या प्रकल्पांच्या प्रगतीवर संबंधित परिमंडळांच्या उपआयुक्तांनी नियमित लक्ष ठेवावे, जेणेकरून कामे विहित मुदतीत आणि योग्य पद्धतीने पूर्ण होतील, असे आयुक्तांनी सांगितले.
विविध प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित व्यक्तींची (पीएपी) यादी संबंधित विभागांनी वेळेत सादर करावी, अशीही सूचना करण्यात आली. पीएपीची प्रक्रिया रखडल्याने प्रकल्पांना विलंब होऊ नये, यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सहआयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग, उपआयुक्त (आयुक्तांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यांच्यासह सर्व सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख, खातेप्रमुख आणि संचालक उपस्थित होते.
