लालबागच्या राजाच्या प्रसादातून रुग्णालयांना वीज!
महापालिकेचा ‘प्रसाद ते ऊर्जा’ उपक्रम; ११ दिवसांत ८० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया, सुमारे ७,७४४ युनिट वीज निर्मितीचे नियोजन
विशेष प्रतिनिधी | मुंबई
लालबागच्या राजाच्या प्रसादातून निर्माण होणारा ओला कचरा आता थेट महानगरपालिका रुग्णालयांच्या दिव्यांना उजेड देणार आहे. गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या अन्न व जैविक कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या सहकार्याने ‘प्रसाद ते ऊर्जा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
मंडळाच्या प्रसाद कक्ष आणि अन्नछत्रातून दररोज सुमारे ८ ते १० मेट्रिक टन ओला कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. हा कचरा निर्मितीच्या ठिकाणीच वेगळा करून विशेष वाहनांद्वारे नायर, कस्तुरबा, जीटीबी आणि शीव रुग्णालयांतील बायोमिथेनेशन प्रकल्पांमध्ये नेला जाणार आहे.
८० टन कचऱ्यातून ७,७४४ युनिट ऊर्जा
गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. त्यातून अंदाजे ७,७४४ युनिट नवीकरणीय वीज निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष वीज निर्मिती कचऱ्याचे प्रमाण, गुणवत्ता आणि प्रकल्पांची कार्यक्षमता यावर अवलंबून राहणार आहे.
प्रत्येक बायोमिथेनेशन प्रकल्पाची क्षमता दररोज सुमारे २ मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची आहे.
प्रसादातून रुग्णालयांना ‘ऊर्जा प्रसाद’
निर्माण होणारी वीज रुग्णालयांतील रुग्ण कक्ष, मार्गिका आणि सामायिक परिसरातील प्रकाशव्यवस्थेसह आवश्यक कामांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे उत्सवातील कचरा केवळ विल्हेवाटीचा प्रश्न न राहता त्याचे रूपांतर उपयुक्त ऊर्जेत होणार आहे.
मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यास त्यातून ऊर्जा निर्माण करता येते, हे या उपक्रमातून दाखवून दिले जाणार आहे. यामुळे कचरा विल्हेवाटीवरील ताण कमी होण्यासोबतच चक्रीय अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.