गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज; विसर्जनस्थळांवर सुविधांचा महापूर
महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून विसर्जनस्थळांची पाहणी; जीवरक्षक, पिण्याचे पाणी, शौचालयांसह सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा

विशेष प्रतिनिधी
मुंबई,
: गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई महानगरपालिका गणेशोत्सवासाठी सज्ज झाली आहे. मुंबईकर, गणेशभक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विसर्जनावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने विविध नागरी सुविधा आणि सुरक्षा उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. यंदा सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी शुक्रवारी उपनगरातील विविध विसर्जनस्थळांची पाहणी केली. यावेळी विसर्जनस्थळांवरील सुविधा, कृत्रिम तलावांची व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. त्याआधीच रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यावर महापालिकेने भर दिला आहे. रस्त्यालगतच्या झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी करण्यात आली असून मिरवणुका आणि नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी मूर्तीकारांना शाडूची माती आणि पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी असलेल्या नैसर्गिक विसर्जनस्थळांवरील तलावांमधील गाळ आणि कचरा काढून स्वच्छता करण्यात आली आहे.
शीतल तलावापासून पाहणीला सुरुवात
महापौर आणि उपमहापौरांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात कुर्ला येथील शीतल तलावापासून झाली. त्यानंतर मुलुंड येथील मोरया तलाव, पवई तलाव, के-उत्तर विभागातील शामनगर तलाव आणि जुहू चौपाटी येथील विसर्जनस्थळाची पाहणी करण्यात आली.
विसर्जनस्थळांवर आवश्यकतेनुसार पुरेशा संख्येने तराफे उपलब्ध ठेवावेत, गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, जीवरक्षकांची नियुक्ती वाढवावी, तसेच पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विसर्जनस्थळांचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना
विसर्जनस्थळांवरील तलावांचे सुशोभीकरण करण्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि महापालिका प्रशासनाने समन्वय साधून विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना उपमहापौर संजय घाडी यांनी दिल्या.
विसर्जनस्थळी जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

“यंदाचा गणेशोत्सव मुंबईकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर वातावरणात साजरा करता यावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे,” असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यात एस व टी प्रभाग समिती अध्यक्षा साक्षी दळवी, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा मीनल तुर्डे, नगरसेवक चंदन शर्मा, सहआयुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, उपआयुक्त संध्या नांदिवडेकर, संतोषकुमार धोंडे यांच्यासह विविध विभागांचे सहायक आयुक्त आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.