इंचॉनच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मुंबईच्या पूर व्यवस्थापनाचा ‘मॉडेल’
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली मुंबईची आपत्ती प्रतिकारक्षमता; अभियांत्रिकी, निसर्गाधारित उपाय आणि एआय तंत्रज्ञानाचा समन्वय

प्रतिनिधी/मुंबई :
बदलते हवामान, अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दक्षिण कोरियातील इंचॉन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी ‘महानगरस्तरीय संपर्क व संवाद कार्यक्रम’ या विशेष सत्रात मुंबईच्या पूर व्यवस्थापनाचे सादरीकरण केले.
दक्षिण कोरियातील इंचॉन येथे ७ आणि ८ सप्टेंबर रोजी ६ व्या आंतरराष्ट्रीय आपत्ती लवचिकता नेतृत्व मंच–इंचॉन २०२६चे आयोजन करण्यात आले होते. इंचॉन महानगरपालिका, संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यालयाचे ईशान्य आशिया कार्यालय, जागतिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि इंचॉन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मंचात ३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
मुंबईसमोरील आपत्तीजन्य धोक्यांचे चित्र
बांगर यांनी सादरीकरणातून मुंबईसमोरील विविध नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यांचे चित्र आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर मांडले. १९७३ ते २०२० या कालावधीत दर दशकाला वार्षिक तापमानात सुमारे ०.२५ अंश सेल्सिअस वाढ, मुंबईतील २४९ भूस्खलनप्रवण क्षेत्रे, दरवर्षी सुमारे १६ दिवस १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद, पूरप्रवण अतिसंवेदनशील क्षेत्रांच्या २५० मीटर परिसरात राहणारी सुमारे ३५ टक्के लोकसंख्या आणि किनारपट्टीलगतच्या ५० हून अधिक दाट लोकवस्त्या, यामुळे मुंबईसमोरील आव्हानांची तीव्रता स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

पूर रोखण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार
मुंबईची पूर प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने नागरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात पूरजोखीम कमी करण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीतील पूर्वतयारी आणि जलनिस्सारण यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
याअंतर्गत उदंचन केंद्रे, साठवण टाक्या, पावसाच्या पाण्याच्या निचरा व्यवस्थेच्या जाळ्याचा विस्तार व बळकटीकरण आणि पाण्याच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी स्वयंचलित पूरद्वार उभारण्यासारख्या संरचनात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिवृष्टीच्या काळात पाणी साचण्याचे प्रमाण कमी करून जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
एआयपासून ‘स्पंज पार्क’पर्यंत उपाययोजना
मुंबईच्या पूर व्यवस्थापनात केवळ अभियांत्रिकी उपायांवर अवलंबून न राहता निसर्गाधारित आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांनाही महत्त्व दिले जात आहे. एकात्मिक पूर्वसूचना व पूर निरीक्षण प्रणाली, जैव-जलधारण प्रणाली, बायोस्वेल्स, स्पंज पार्क, हरित मार्गिका तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट नाले व जलनिस्सारण व्यवस्थापन प्रणाली यांची माहिती बांगर यांनी परिषदेत दिली.
याशिवाय, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली प्रगत पूर्वसूचना प्रणाली मुंबईतील विविध भागांसाठी तीन दिवसांपर्यंतचा पावसाचा अंदाज देण्यास सक्षम आहे. या पूर्वसूचनेच्या आधारे महापालिकेला अतिवृष्टीपूर्वी आवश्यक प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना करता येतात, असे बांगर यांनी स्पष्ट केले.
अभियांत्रिकी + निसर्ग + तंत्रज्ञानाचा समन्वय
मुंबईसाठी पूर व्यवस्थापनाचा सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन आराखडा विकसित केला जात असून त्यात अभियांत्रिकी उपाय, निसर्गाधारित उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधला जात आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची आपत्ती प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी महापालिका करत असलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण आंतरराष्ट्रीय मंचावर करण्यात आले, हे या परिषदेत मुंबईच्या सहभागाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.