गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा नको; कृत्रिम तलावांची संख्या वाढवा
महापौर रितू तावडे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश; गिरगाव चौपाटीसह शहरातील विसर्जनस्थळांची पाहणी

प्रतिनिधी/मुंबई :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेली तयारी समाधानकारक आहे. मात्र, गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे तातडीने दूर करावेत. अधिकाधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याबरोबरच नैसर्गिक विसर्जनस्थळांवर मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी दिले.
१४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर तावडे यांनी गुरुवारी मुंबई शहर विभागातील विविध गणेश विसर्जनस्थळांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेने केलेल्या पूर्वतयारीचा आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या नागरी सुविधांचा आढावा घेतला.
गिरगाव चौपाटीवर सुविधा वाढविण्याच्या सूचना
पाहणी दौऱ्याची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून झाली. त्यानंतर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), वरळीतील लोटस जेट्टी, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानालगतचे महापालिका क्रीडाभवन व केळुसकर मार्ग (उत्तर), तसेच शीव तलाव येथे महापौरांनी पाहणी केली.

गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन फिरत्या प्रसाधनगृहांची संख्या वाढवावी, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी आणि जीवरक्षकांची संख्या वाढवावी, असे निर्देश तावडे यांनी दिले. विसर्जनानंतर संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेचीही त्यांनी माहिती घेतली.
‘सेवा मोफत’चे फलक ठळकपणे लावा
गणेशमूर्ती विसर्जनासह महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध नागरी सुविधा विनामूल्य असल्याची माहिती भाविकांना स्पष्टपणे मिळावी, यासाठी स्वराज्यभूमीसह सर्व विसर्जनस्थळांवर मोठ्या संख्येने माहिती फलक लावावेत, असेही महापौरांनी सांगितले.
सर्व विसर्जनस्थळांवरील कृत्रिम तलावांची बांधणी, मूर्ती विसर्जनाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, प्रकाशयोजना, स्वच्छता, जीवरक्षक तसेच विसर्जनाच्या दिवशीची सुरक्षा व्यवस्था यांचा महापौरांनी सर्वंकष आढावा घेतला.
गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने तयार केलेल्या ‘श्रीगणेशोत्सव २०२६’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात करण्यात आले.
या पुस्तिकेत नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन तलावांची माहिती, गणेशभक्तांसाठी उपलब्ध नागरी सुविधा, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आवश्यक सूचना तसेच ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार’ स्पर्धेचा प्रवेश अर्ज यांचा समावेश आहे.
या वेळी सभागृहनेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि अभिनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.