गिरगाव चौपाटीवर प्रथमच ‘आपत्कालीन नियंत्रण कक्ष’
अनंत चतुर्दशीला लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज; पोलीस, अग्निशमन, आरोग्य, एनडीआरएफसह विविध यंत्रणा एकाच छताखाली
सीसीटीव्हीच्या थेट प्रक्षेपणासह दोन ड्रोनची नजर; हॅम रेडिओ आणि बिनतारी यंत्रणेद्वारे तातडीचा समन्वय
मुंबई, दि. २४ : अनंत चतुर्दशीला (२५ सप्टेंबर) गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने यंदा प्रथमच व्यापक स्वरूपात ‘आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित केला आहे. चौपाटी परिसरात कोणतीही दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलीस, अग्निशमन, आरोग्य, एनडीआरएफ आणि महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांमध्ये क्षणात समन्वय साधून मदतकार्य सुरू करता यावे, हा या नियंत्रण कक्षाचा मुख्य उद्देश आहे.
अनंत चतुर्दशीला मुंबईतील मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार असल्याने लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा तैनात केली आहे.
एकाच कक्षातून अनेक यंत्रणांवर नजर
उपआयुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव आणि सहायक आयुक्त (डी विभाग) संतोष साळुंके यांच्या समन्वयाने हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
या कक्षात महापालिका मुख्यालयातील केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, बेस्ट, मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे हॅम रेडिओ चालकही समन्वयासाठी तैनात असतील.
संदेशवहनासाठी मोबाइल फोन, डिजिटल मोबाईल रेडिओ आणि हॅम रेडिओ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीसीटीव्हीच्या थेट प्रक्षेपणासह ड्रोनची नजर
गिरगाव चौपाटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर पाहता येणार आहे. त्यासोबतच समुद्रकिनारी किंवा गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास तातडीने माहिती मिळावी यासाठी दोन ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षातून अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबंधित विभागांशी थेट समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन विभाग) रश्मी लोखंडे यांनी दिली.
प्रकाश, पाणी, रुग्णवाहिकांसह सर्व सुविधा
गिरगाव चौपाटीवर भाविकांसाठी प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, सुरक्षा व गर्दी नियंत्रण व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक, नागरिक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येत असल्याने गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
आग किंवा बुडण्याच्या दुर्घटनेवर प्रशिक्षण
दरम्यान, चौपाटीवर मंडपाला आग लागणे, समुद्रात एखादी व्यक्ती बुडणे यांसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने कोणती कार्यवाही करावी, याबाबत डी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ सप्टेंबर रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रत्यक्ष घटनास्थळी यंत्रणा आणि नियंत्रण कक्ष यांच्यातील जलद समन्वयावर यंदा विशेष भर देण्यात आला आहे.

