दादरच्या फुल-भाजी कचऱ्यावर आता जागेवरच प्रक्रिया; लालबाग गणेशोत्सवासाठी महापालिकेची युद्धपातळीवर तयारी
दादर फुल बाजारातील १० टन आणि भाजी मंडईतील १५ टन कचऱ्यापासून खत, अगरबत्ती, गॅस निर्मितीचा प्रस्ताव
वाहतूक कोंडी, पार्किंगसह गणेशभक्तांच्या सुविधांचा अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी घेतला आढावा

प्रतिनिधी /मुंबई :
दादरच्या फुल बाजार आणि भाजी मंडईत दररोज निर्माण होणाऱ्या तब्बल **२५ मेट्रिक टन कचऱ्याची क्षेपणभूमीवर वाहतूक करण्याऐवजी त्याच परिसरात विल्हेवाट लावण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने पाऊल टाकले आहे. फुलांच्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत, अगरबत्ती तर भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून भूकटी, गॅस आणि अन्य सेंद्रिय उत्पादने तयार करण्यासाठी अभिनव प्रकल्प राबविण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले.
परिमंडळ-२ अंतर्गत एफ उत्तर आणि जी उत्तर विभागातील विविध परिसर व प्रकल्पांची पाहणी करताना त्यांनी हे निर्देश दिले. कचरा हा केवळ समस्या नसून त्यातून रोजगार आणि उत्पन्ननिर्मितीची संधी आहे, या भूमिकेतून स्थानिक पातळीवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
१० टन फुलांचा कचरा; अगरबत्तीपासून खतापर्यंत प्रयोग
दादर येथील मॉं साहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारात दररोज सुमारे १० मेट्रिक टन टाकाऊ फुले जमा होतात. हा कचरा दूरवर क्षेपणभूमीवर नेण्याऐवजी परिसरातच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
फुलांपासून सेंद्रिय खत, अगरबत्ती यांसारखी उत्पादने तयार करण्याची शक्यता तपासली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे कचऱ्याचे वर्गीकरण वाढण्यासोबतच स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते. स्वयंसेवी संस्था आणि व्यापारी संघटनांच्या सहभागातून हा प्रकल्प राबविण्याच्या शक्यता तपासण्याचे निर्देश जी उत्तर विभागाला देण्यात आले.

भाजी मंडईतून रोज १५ टन कचरा
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील क्रांतिसिंह नाना पाटील महानगरपालिका भाजी मंडईत दररोज सुमारे १५ मेट्रिक टन भाजीपाल्याचा कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावरही स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून भूकटी, गॅस तसेच सेंद्रिय उत्पादने तयार करण्याची शक्यता आहे.
कचऱ्याची दररोज प्रभावी विल्हेवाट, स्वच्छता आणि कचरा वर्गीकरण यावर विशेष भर देण्यासोबतच मंडई परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.
फुल बाजाराबाहेर मालवाहू वाहनांना ‘नो पार्किंग’
फुल बाजार परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही पाहणीदरम्यान ऐरणीवर आला. फुल बाजाराबाहेरील रस्त्यांवर मालवाहू वाहने उभी राहणार नाहीत, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. व्यापारी संघटनांनीही निर्धारित जागेतच वाहने पार्क करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वर्मा-लवंगारे यांनी केले.
लालबाग गणेशोत्सवासाठी ‘फुलप्रूफ’ नियोजन
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणेशभक्तांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रांग व्यवस्थापन, बॅरिकेडिंग, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन आधीच पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने आणि आधीपासूनच तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
माहीम-वरळी उड्डाणपुलालाही गती
माहीम मच्छीमार वसाहतीतून पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे) आणि वरळी-वांद्रे सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली. प्रकल्पाच्या मार्गावरील पुनर्वसनाची गरज असलेल्या कुटुंबांच्या स्थलांतरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांचे विहित वेळेत निष्कासन करून प्रकल्पाला गती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
या पाहणीवेळी उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त वृषाली इंगळे, सहायक आयुक्त योगेश देसाई, सहायक आयुक्त (बाजार) सुनील माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.