निरोगी युवक, निरोगी मुंबईचा संदेश; ‘रेड रन २०२६’ला ५०० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महापौर रितू तावडे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ
विजेत्यांची बिहारमधील राष्ट्रीय ‘रेड रन’साठी निवड

प्रतिनिधी/मुंबई :
एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती आणि तरुणांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी मुंबईत रविवारी ‘रेड रन २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वज दाखवून ४ किलोमीटरच्या या मॅरेथॉनचा शुभारंभ झाला. ‘रन टू एंड एड्स’ या संकल्पनेखाली आयोजित या स्पर्धेत ५०० हून अधिक महाविद्यालयीन युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या, “निरोगी आणि सक्षम युवा पिढी हेच देशाचे भविष्य आहे. एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृतीसोबतच सक्रिय जीवनशैली आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”
महापौर तावडे म्हणाल्या की, मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर स्वप्न आणि ऊर्जेचे शहर आहे. मुंबई महापालिका नागरी सुविधा व पायाभूत सुविधांसोबतच दर्जेदार सार्वजनिक आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. एचआयव्ही/एड्सचा प्रतिबंध, नियंत्रण आणि जनजागृतीचे महत्त्वाचे काम मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था करत आहे. हे अभियान केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांतून यशस्वी होणार नाही. त्यासाठी नागरिक आणि विशेषतः तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
‘फक्त धावणे नाही, तर जनजागृतीची चळवळ’
‘रेड रन’ ही केवळ मॅरेथॉन नसून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारी चळवळ आहे, असे महापौरांनी सांगितले. “आज कोणी जिंकेल, तर कोणी अनुभव घेईल; मात्र एका उदात्त उद्देशासाठी एकत्र धावणे आणि एचआयव्ही/एड्सविषयीचा जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. ‘निरोगी युवक, निरोगी शहर’ हा मंत्र सर्वांनी अंगीकारावा,” असे आवाहन त्यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे २०० हून अधिक कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक धावमार्गावर कार्यरत होते.
विजेत्यांना बिहारमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्वाची संधी
‘रेड रन २०२६’मधील विजेत्या युवक-युवतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विजेत्यांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या वतीने ऑक्टोबर २०२६मध्ये बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय ‘रेड रन मॅरेथॉन’मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी महापालिका शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम’अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. या स्पर्धेची शालेय फेरी १२ ऑगस्टला, तर उपांत्य आणि अंतिम फेरी ११ सप्टेंबरला झाली होती.
१९० महाविद्यालये, २५० शाळांमध्ये जनजागृती
मुंबईतील १९० महाविद्यालयांमध्ये ‘रेड रिबन क्लब’ आणि २५० महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्स प्रतिबंधाबाबत जनजागृती केली जात आहे. तरुणांपर्यंत आरोग्यविषयक योग्य माहिती पोहोचवून प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा महापालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, डॉ. अमिता पेडणेकर, डॉ. विजयकुमार करंजकर, उमेश घुगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि धावपटू उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेचे अतिरिक्त सचिव व महासंचालक डॉ. राकेश गुप्ता आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.