नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड थेट जोडणारा भूमिगत मार्ग
७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांना लँडस्केप गार्डनपर्यंत सहज पोहोचता येणार; सुमारे १ किमी लांबीचा, ७.५ मीटर रुंदीचा पादचारी मार्ग
मुंबई, २० ऑगस्ट : मुंबईच्या वाहतूक आणि पर्यटन सुविधांना नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे. नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्थानक (मेट्रो-३) ते वरळी प्रॉमेनेड आणि प्रस्तावित लँडस्केप गार्डन यांना जोडणारा सुमारे १ किलोमीटर लांबीचा आणि ७.५ मीटर रुंदीचा भूमिगत पादचारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने मंजूर करण्यात आला. या कामासाठी ७०२ कोटी ४४ लाख ३५ हजार ७ रुपये खर्च अपेक्षित असून, कामाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (MMRCL) करण्यात येणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ही माहिती देताना सांगितले की, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगत सुमारे ३०० एकर क्षेत्रावर भव्य लँडस्केप गार्डन प्रस्तावित आहे. या गार्डनसोबतच नागरिकांसाठी सागरी किनाऱ्यालगत प्रॉमेनेड उपलब्ध होणार आहे. मात्र, सध्या या परिसरात खासगी वाहनाने पोहोचणे तुलनेने सोपे असले तरी मेट्रो किंवा पायी येणाऱ्या नागरिकांसाठी थेट आणि सक्षम जोडणीचा अभाव आहे. हीच कोंडी दूर करण्यासाठी भूमिगत पादचारी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
मेट्रो स्थानकातून थेट प्रॉमेनेडपर्यंत पायी जाता येणार
मेट्रो-३च्या नेहरू विज्ञान केंद्र स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातून पुढे लाला लजपतराय रस्त्याखालून थेट वरळी प्रॉमेनेड आणि लँडस्केप गार्डनपर्यंत पोहोचता येणार आहे. सुमारे ७.५ मीटर रुंदीमुळे या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिकांची सुरक्षित आणि सुलभ ये-जा शक्य होणार आहे.
मुंबईत मेट्रोचा वापर सातत्याने वाढत असताना या भूमिगत मार्गामुळे मेट्रो, पादचारी सुविधा, सागरी किनारा रस्ता, प्रॉमेनेड आणि लँडस्केप गार्डन यांची प्रभावी सांगड घातली जाणार आहे. परिणामी खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीला आणि पादचारी सुविधांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
पर्यटनाला मिळणार नवी झेप
लँडस्केप गार्डन पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांसोबतच देश-विदेशातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी हा परिसर आकर्षणाचे नवे केंद्र ठरणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात या पर्यटनस्थळी पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे हा भूमिगत मार्ग केवळ वाहतुकीची सुविधा न राहता मुंबईच्या पर्यटन पायाभूत सुविधांमधील महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मेट्रो-३च्या तांत्रिक क्षमतेचा वापर
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जून २०२५ मध्ये भूमिगत बोगदा उभारण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत हे काम MMRCLमार्फत करण्यास मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी मान्यता दिली. या कामाचा संपूर्ण आर्थिक भार महानगरपालिकेकडून उचलण्यात येणार आहे.
महापालिकेने यापूर्वी मेट्रो-३ प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मेट्रोच्या विस्तारामुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवरील ताण आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत असल्याने नागरिकांच्या हिताचा हा प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘मलिद्याची सवय असलेल्यांना प्रस्ताव पचत नाही’
महानगरपालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहेत. त्यामुळे एका सार्वजनिक संस्थेने दुसऱ्या संस्थेच्या तांत्रिक क्षमतेचा वापर करून नागरिकांच्या हिताचे काम करून घेण्यात गैर काय, असा सवाल प्रभाकर शिंदे यांनी केला.
कंत्राटदारामार्फत काम देण्याऐवजी भूमिगत कामातील मेट्रो-३ची तांत्रिक क्षमता वापरून प्रकल्प अधिक परिणामकारक आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “कंत्राटी कामांमधील मलिद्याची सवय असलेल्या मंडळींना हा प्रस्ताव पचनी पडत नसल्याचे दिसते,” असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
“भारतीय जनता पक्षासाठी मुंबईकरांचे हित सर्वोच्च आहे. नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी पादचारी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भूमिगत मार्गामुळे भविष्यात मेट्रो ते प्रॉमेनेड आणि लँडस्केप गार्डन असा अखंड पादचारी संपर्क निर्माण होणार असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पर्यटन विकासाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.