नेहरू विज्ञान केंद्र–तारांगण उड्डाणपूल ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करा
वाहतूक कोंडी कमी होणार; प्रवासाचा वेळ १५ मिनिटांनी वाचणार | अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
प्रतिनिधी/मुंबई, :
वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपूल व सबवे प्रकल्पाचे काम ३१ जानेवारी २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. प्रकल्पस्थळी पाहणी करून त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उर्वरित कामांसाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि अन्य संसाधने वाढवून कामाचा वेग आणखी वाढवावा, असेही त्यांनी बजावले.
पाइलिंगपासून गर्डर उभारणीपर्यंत वेगाने काम
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिमी व्यासाच्या मुख्य पाइलिंगचे काम पूर्ण झाले आहे. १८ पैकी १७ पाइल कॅप, १८ पैकी १७ पिअर आणि १८ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. जिजामाता नगरच्या बाजूचे पाइलिंग तसेच १७ पैकी सर्व पाइल कॅप, पिअर आणि पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पातील १४ पैकी १४ पोर्टल बीम तयार झाले असून, १८ पैकी १७ गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी १३ पोर्टल बीम आणि ९ गर्डर स्पॅनची प्रत्यक्ष उभारणीही पूर्ण झाली आहे. १८ पैकी ७ स्पॅनच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण झाले असून, आणखी २ स्पॅनचे काम सुरू आहे.
प्रवासाचा वेळ १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा
या उड्डाणपुलामुळे वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या नेहरू विज्ञान केंद्राकडून पुढे जाणाऱ्या वाहनांना वरळी नाका अर्थात आचार्य अत्रे चौकातून वळसा घालावा लागतो. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.
ई. मोझेस मार्गावरून अॅनी बेझंट मार्ग आणि धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे जाण्यासाठी हा अधिक थेट मार्ग ठरणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच वाहनांचा प्रवासाचा वेळ, अंतर आणि इंधनाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश
प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवावा. वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने वाहतूक आराखडा तयार करून काम पुढे न्यावे, असे निर्देश बांगर यांनी दिले.
पाहणीवेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते.
