भायखळा प्राणिसंग्रहालयात ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’चा शुभारंभ
निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट’चा संदेश; विद्यार्थी-निसर्गप्रेमींसाठी प्रदर्शन, कार्यशाळा व व्याख्यानांची मेजवानी

प्रतिनिधी/मुंबई :
राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’चा शुक्रवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. ‘निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट’ ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वन्यवाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात विद्यार्थी, पर्यटक, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी दररोज विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वन्यजीवांवरील माहिती प्रदर्शन, विशेष कार्यशाळा, माहितीपटांचे प्रदर्शन आणि तज्ज्ञांची व्याख्याने यामुळे नागरिकांना वन्यजीव संवर्धनाची शास्त्रीय माहिती मिळणार आहे.
१७ संस्थांचा सहभाग
महोत्सवातील माहिती प्रदर्शनात पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचा सहभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, जेन गुडॉल इन्स्टिट्यूट, वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सीड स्टोरीज, ग्रीन वर्क ट्रस्ट, सृष्टिज्ञान, गोदरेज, असर, क्लायमेट कल्चर कलेक्टिव्ह, अरेण्य, प्रोजेक्ट मुंबई आणि वनभाषी यांसह संस्थांनी प्रदर्शन उभारले आहे.

या प्रदर्शनात वन्यजीव व पर्यावरण संवर्धनातील प्रत्यक्ष कामाची छायाचित्रे, माहिती फलक आणि शास्त्रीय नमुने मांडण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि निसर्गप्रेमींना वन्यजीव संवर्धनाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून घेता येणार आहे.
संवर्धनासोबत जनजागृतीवर भर
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दुर्मीळ प्राणी व पक्ष्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन केले जाते. त्यासोबतच नागरिक आणि विशेषतः शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यावर महोत्सवातून भर दिला जात आहे.
उद्घाटनप्रसंगी प्राणिसंग्रहालयाच्या उपसंचालक डॉ. कोमल राऊळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवानंद शिरसाट, जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थी, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींनी या महोत्सवातील विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.