महालक्ष्मीतील केबल स्टेड पूल डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य; ७८.५ मीटर उंच पायलॉन उभारला

प्रतिनिधी/मुंबई
: महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील केशवराव खाड्ये मार्गावर मुंबई महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित केबल स्टेड उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला आहे. या कामाची अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला आणि संबंधित अभियंत्यांना आवश्यक निर्देश दिले. हा पूल ३१ डिसेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूल विभागाने ठेवले आहे.
रेल्वे रुळांवरील महापालिकेचा पहिला केबल स्टेड पूल
केशवराव खाड्ये मार्गावरील हा महापालिकेचा रेल्वे रुळांवरील पहिला केबल आधारित पूल ठरणार आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानक परिसरातून हा पूल सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना जोडणार आहे. पुलाची एकूण लांबी ८०३ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील पुलाची रुंदी २३.०१ मीटर राहणार आहे.
पुलाच्या मुख्य केबल स्टेड भागाला आधार देण्यासाठी तब्बल ७८.५ मीटर उंचीचा भव्य पायलॉन उभारण्यात आला आहे. पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. तर पूर्वेकडील १६५ मीटर लांबीचा स्पॅन रेल्वे हद्दीत येत असल्याने रेल्वे विभागाकडून आवश्यक ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर त्याची उभारणी करण्यात येणार आहे.
वाहतूक वळविल्यानंतर पाच खांबांची उभारणी
पायलॉनच्या पश्चिमेकडील बहुतांश खांबांचे काम पूर्ण झाले असले तरी वाहतूक वळविण्याच्या प्रक्रियेमुळे पाच खांबांची उभारणी अद्याप बाकी आहे. वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.
वाहतूक वळविण्यासाठी महापालिकेकडून काँक्रीटचा सेवा रस्ता तयार केला जात असून, या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर विविध उपयोगिता वाहिन्या स्थलांतरित/टाकण्याची कामेही सुरू आहेत.
रेल्वे ‘ब्लॉक’ आणि वाहतूक व्यवस्थापन महत्त्वाचे
पुलाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या स्पॅनचे काम रेल्वे हद्दीत असल्याने रेल्वे विभागाकडून मिळणाऱ्या आवश्यक ‘ब्लॉक’वर या कामाची पुढील गती अवलंबून आहे. तसेच पश्चिमेकडील पाच खांबांचे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच सात रस्ता आणि महालक्ष्मी मैदान यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे.
पाहणीदरम्यान प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.