वाकोला परिसरातील पदपथांवरील ३७ अनधिकृत दुकाने हटवली
पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत महापालिकेची धडक कारवाई; पदपथ अडथळामुक्त

प्रतिनिधी/मुंबई :
पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानांतर्गत वाकोला परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. ‘एच पूर्व’ विभागाने राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली ३७ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे केले. यावेळी पदपथावर अडथळा निर्माण करणारे साहित्यही जप्त करण्यात आले.
माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी वाकोला येथे ही कारवाई करण्यात आली.
उपायुक्त (परिमंडळ-३) श्री. विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एच पूर्व विभाग) श्रीमती मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली. राजेंद्र कांबळे मार्गालगतच्या पदपथांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेली ३७ दुकाने निष्कासित करण्यात आली. तसेच पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणारे विविध साहित्य हटवून जप्त करण्यात आले.
या कारवाईसाठी सुमारे ३१ अधिकारी-कर्मचारी, ४ वाहने, २ डंपर, १ जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
पदपथांवर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई
मुंबईतील पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असून त्यावर अनधिकृत दुकाने, बांधकामे अथवा अन्य साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात महापालिकेकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. पदपथांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठीही प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पादचाऱ्यांना सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देणे हा ‘पादचारी प्रथम’ अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे पदपथांवर अनधिकृत बांधकाम करू नये किंवा कोणतेही साहित्य ठेवून अडथळा निर्माण करू नये. असे प्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.