मुंबईत SIR साठी अखेरचे चार दिवस; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे ERO-BLO यंत्रणेला ‘फिनिशिंग टच’चे आदेश
१७ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज, डिजिटायझेशन आणि गृहभेटी पूर्ण करण्याचे निर्देश; ‘बुक अ कॉल’वरील मतदारांच्या शंकांचे तत्काळ निराकरण करा

प्रतिनिधी/मुंबई :
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) आता अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईतील निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. १७ ऑगस्ट ही गणना अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असल्याने उर्वरित चार दिवसांत प्रलंबित कामाला वेग देऊन प्रक्रिया पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईतील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (ERO) दिले.
मुंबई शहर आणि उपनगरातील SIRच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात आज बैठक झाली. यावेळी चोक्कलिंगम यांनी प्राप्त न झालेले गणना अर्ज, डिजिटायझेशन आणि मतदारांच्या गृहभेटी या तिन्ही आघाड्यांवर वेग वाढवण्याचे आदेश दिले.
‘बुक अ कॉल’वरील शंकांकडे दुर्लक्ष नको
SIR प्रक्रियेत गणना अर्जाबाबत मतदारांकडून ‘बुक अ कॉल’च्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या शंकांचे तत्काळ निराकरण करण्यास प्राधान्य द्यावे, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
मतदारांना अर्ज भरताना अडचण येऊ नये, प्रलंबित अर्ज वेळेत मिळावेत आणि मिळालेल्या अर्जांचे डिजिटायझेशन वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी यंत्रणेने उर्वरित दिवसांत अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
‘मार्क्ड इलेक्टर्स’वर विशेष लक्ष
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चिन्हांकित मतदारांच्या (Marked Electors) नोंदींबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
पात्र आणि हयात मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होतील, तर मृत मतदारांची नावे प्रारूप यादीत येणार नाहीत, याची खात्री विहित प्रक्रियेनुसार करण्याचे त्यांनी सांगितले.
गणना अर्ज संकलन, डिजिटायझेशन आणि गृहभेटींसाठी आता अवघे काही दिवस उरले असल्याने प्रत्येक स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, असे भिडे यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या मतदार यादीसाठी निर्णायक चार दिवस
मुंबईतील SIR प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा असल्याने येत्या चार दिवसांत प्रशासनासमोर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, प्रलंबित अर्ज मिळवणे, त्यांचे डिजिटायझेशन करणे आणि संशयित/चिन्हांकित नोंदींची योग्य पडताळणी करणे हे मोठे आव्हान आहे.
१७ ऑगस्टनंतर प्रारूप मतदार यादीच्या प्रक्रियेला पुढचा टप्पा सुरू होणार असल्याने मुंबईतील मतदार यादी किती अचूक आणि अद्ययावत राहणार, हे या चार दिवसांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, सर्व ERO तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.