प्रतिनिधी/ मुंबई :
कुर्ला पश्चिमेकडील चिरागनगर परिसरात बुधवारी पहाटे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गौसिया चाळ, राठोड मेडिकलजवळ पहाटे ३.४८ वाजता ही दुर्घटना घडली. दरड आणि मातीचा काही भाग चाळीतील जवळच्या दोन ते तीन खोल्यांवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पहाटे ४.३२ वाजता अग्निशमन दलाने दुर्घटनेला लेव्हल-२ घोषित केले. ढिगारा हटवून संभाव्यतः अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळी एनडीआरएफच्या जवानांसह बीएमसीचे सुमारे ५० कर्मचारी बचावकार्यात सहभागी आहेत. रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाचे डीएफओ, २ एडीएफओ, २ वरिष्ठ स्थानक अधिकारी आणि ४ स्थानक अधिकारी यांच्यासह फायर इंजिन, रेस्क्यू व्हॅन, मोबाइल वॉटर टँकर आणि अन्य वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
दोघांचा मृत्यू; दोघे जखमी
ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुर्ला भाभा रुग्णालयात सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या साहिल अन्सारी (२८) आणि मोहम्मद समीर (१४) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.
पहाटेच्या अंधारात अचानक दरड आणि चाळीच्या खोल्यांवर कोसळलेल्या ढिगाऱ्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले आहेत का, याचा शोध बचाव पथकांकडून घेतला जात आहे.