रॅम्प हटवा, नाहीतर कारवाईला सामोरे जा!; बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांचा सोसायट्या आणि गाळेधारकांना अल्टिमेटम
पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियानाला वेग; एका महिन्यात पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश

मुंबई /प्रतिनिधी
मुंबईतील पदपथांवर अनधिकृतपणे उभारलेले रॅम्प, व्यावसायिक अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या मार्गातील कोणतेही अडथळे आता सहन केले जाणार नाहीत. गृहनिर्माण संस्था, गाळेधारक आणि व्यावसायिकांनी अशा सर्व अनधिकृत रॅम्प व अतिक्रमणे एका महिन्याच्या आत स्वखर्चाने हटवावीत, अन्यथा बृहन्मुंबई महानगरपालिका कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिला आहे.
‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियानाअंतर्गत आयुक्त भिडे यांनी गुरुवारी विलेपार्ले, गोरेगाव आणि पश्चिम उपनगरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना पदपथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले. स्वामी विवेकानंद मार्ग, राम गणेश गडकरी मार्ग, बंडू गोरे मार्ग, गोरेगाव स्टेशन परिसर, टोमॅटो गल्ली आणि दूधसागर मार्ग या भागातील पदपथांची त्यांनी पाहणी केली.
आयुक्तांनी स्पष्ट केले की, मुंबईतील पदपथ हे वाहनांसाठी नव्हे, तर पादचाऱ्यांसाठी आहेत. सोसायट्यांनी वाहनांच्या प्रवेशासाठी बांधलेले रॅम्प, दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे आणि इतर अडथळ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने अशा प्रकारांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
‘के पश्चिम’ विभागात पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. विभागातील ३५५ मार्गांपैकी २७ प्रमुख मार्गांची निवड करण्यात आली असून, ३७.७ किलोमीटर पदपथ नागरिकांसाठी मोकळे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कूपर रुग्णालय आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष लक्ष
विलेपार्लेतील कूपर रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर रुग्णवाहिका, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी वर्दळ असते. याच परिसरात अनेक महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. पदपथांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने वाहतुकीवर ताण येतो आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे या मार्गांना अडथळामुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
गोरेगाव स्टेशन परिसरात व्यावसायिकांचे स्थलांतर
गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील बंडू गोरे मार्गावरील अतिक्रमणामुळे दररोज सुमारे ७० हजार प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहणीत समोर आले. या मार्गावरील ४३ व्यावसायिक बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू असून रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात स्वामी विवेकानंद मार्ग-बंडू गोरे मार्ग जंक्शनवरील वळण सुधारण्यासाठी आणखी ११ बांधकामे हटविण्याचे नियोजन आहे.
आयुक्त भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पदपथांचे सुशोभीकरण, सुरक्षितता आणि अतिक्रमणमुक्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, अनधिकृत रॅम्प किंवा अतिक्रमणे कायम ठेवणाऱ्यांविरोधात नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.