झाडांना विषारी इंजेक्शन, नियमबाह्य छाटणी; दोन गृहनिर्माण संस्थांवर महापालिकेचा कायद्याचा बडगा
झाडांना इजा करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही'; अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलत वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन गृहनिर्माण संस्थांविरोधात थेट पोलीस कारवाई केली आहे. झाडांना विषारी इंजेक्शन देऊन सुकविण्याचा प्रकार आणि मंजूर परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी केल्याप्रकरणी संबंधित हाऊसिंग सोसायट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मालाड (पूर्व) येथील दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी परिसरातील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन सुकविण्यात आल्याची ऑनलाईन तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती. त्यानंतर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, पेल्टोफोरम प्रजातीच्या झाडाच्या बुंध्यात सुमारे २० ते २२ छिद्रे पाडून त्यामध्ये विषारी द्रव्य इंजेक्शनद्वारे सोडल्याचे आढळून आले. तसेच दुसरे झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत असल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकारानंतर संबंधित सोसायटीचे पदाधिकारी आणि विकासकाविरोधात कुरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटीवर करण्यात आली. या गृहसंकुलातील १०० हून अधिक झाडांची महापालिकेने मंजूर केलेल्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात छाटणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. प्रत्यक्ष पाहणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित सोसायटीविरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, वृक्षांना इजा पोहोचविणे, विषारी इंजेक्शन देणे, अनधिकृतपणे छाटणी करणे किंवा झाडे नष्ट करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे प्रत्येक व्यक्ती, संस्था आणि विकासकासाठी बंधनकारक असून नियम मोडणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, झाडांना इजा पोहोचविणे, विषारी द्रव्यांचा वापर करणे किंवा अनधिकृत छाटणी होत असल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती द्यावी. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.