टीबीला घाबरू नका, वेळेत उपचार घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होतो’; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आवाहन
टीबीमुक्त मुंबई' अभियानाला वेग; चेंबूरमध्ये जनजागृती फेरीत विद्यार्थी, स्वयंसेवक आणि कलाकारांचा सहभाग
‘
मुंबई | प्रतिनिधी
“टीबी हा लपवण्याचा किंवा घाबरण्याचा आजार नाही. वेळेत निदान होऊन नियमित उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना आधार द्या आणि ‘टीबीमुक्त मुंबई’च्या अभियानात प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे,” असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बुधवारी केले.
‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत चेंबूर येथील श्री नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र लोकभवन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्ष आणि श्री नारायण गुरू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांची नगरी आहे. या शहराला टीबीमुक्त करणे ही केवळ सरकारची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. टीबी हा केवळ वैद्यकीय विषय नसून सामाजिक आणि आर्थिक आव्हानही आहे. मात्र, या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध असून वेळेत तपासणी आणि उपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमार्फत टीबी रुग्णांसाठी विविध उपचार सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत उपचार अर्धवट न सोडता पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यपालांनी टीबीग्रस्तांबाबत समाजातील गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त करत, “एखाद्या व्यक्तीला टीबी झाला म्हणून त्याच्याशी भेदभाव करणे अमानवी आहे. अशा रुग्णांना मानसिक आधार आणि सामाजिक स्वीकार मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे स्पष्ट केले.
दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये टीबीबाबत अधिक व्यापक जनजागृती करण्यावर भर देत त्यांनी विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवी संस्थांनी या अभियानात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले. समाजाचा व्यापक सहभाग मिळाल्यास ‘टीबीमुक्त मुंबई’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ हे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी यांनीही नागरिकांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. “मुंबईकरांनी प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली आहे. त्याच ताकदीने टीबीविरोधातील लढ्यातही प्रत्येकाने सहभागी व्हावे. ‘टीबीमुक्त मुंबई’ हे केवळ सरकारी अभियान न राहता लोकचळवळ बनणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला अभिनेते शिव ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.