कुर्ला पश्चिम ‘पूरमुक्त’ करण्यासाठी पालिकेचा १३.१९ कोटींचा आराखडा!
सोनापूर लेन जंक्शन व काळे मार्गावरील पाणी तुंबण्याचा प्रश्न मार्गी; पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणार
मुंबई | प्रतिनिधी
कुर्ला पश्चिमेतील एल.बी.एस. मार्गावरील सोनापूर लेन जंक्शन आणि काळे मार्ग परिसरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. या पूरप्रवण भागातील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी तब्बल ₹१३ कोटी १९ लाखांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यास गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या या परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान अपुरे असल्याने मुसळधार पावसाच्या वेळी पाण्याचा निचरा वेळेत होत नाही. परिणामी एल.बी.एस. मार्ग, सोनापूर लेन, काळे मार्ग आणि काजूपाडा पाइपलाइन रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते, तसेच नागरिकांना दरवर्षी पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो.
महापालिकेच्या कुर्ला विभागातील वर्षाप्रवण क्षेत्र क्रमांक ४०८ अंतर्गत ठाणे कॅबीन नाला प्रणालीशी जोडलेल्या काळे मार्ग आणि सोनापूर लेन परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या, कॅच पिट्स आणि संबंधित जलनिस्सारण संरचनांची पुनर्रचना व रुंदीकरण करण्यात येणार आहे. या भागातील पावसाचे पाणी सुंदरबाग नाला, काजूपाडा पाइपलाइन मार्ग आणि एल.बी.एस. मार्गावरील जलवाहिन्यांद्वारे मिठी नदीला जोडलेल्या अशोक लेलँड आउटफॉल पर्यंत अधिक वेगाने पोहोचेल, अशी योजना आहे.
एम.डब्ल्यू.एच. (इंडिया) प्रा. लि. या सल्लागार संस्थेच्या शिफारशीनुसार हा प्रकल्प राबविण्यात येत असून, जलवाहिन्यांचे रुंदीकरण आणि आधुनिकीकरण पूर्ण झाल्यानंतर मुसळधार पाऊस किंवा मिठी नदीची पातळी वाढली तरी या परिसरातील पाणी तुंबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल, असा महापालिकेचा दावा आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुर्ला पश्चिमेतील सर्वाधिक पूरग्रस्त जंक्शनपैकी एक असलेल्या सोनापूर लेन परिसराला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.