ड्रग्ज फ्री मुंबई’ मोहिमेचा 30 जुलैला भव्य शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रारंभ
मुंबईतील लाखो विद्यार्थी घेणार व्यसनमुक्तीची शपथ; शाळा, महाविद्यालये, 150 स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, बेस्ट, मेट्रो आणि गणेशोत्सव मंडळांचा सहभाग

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ या व्यापक जनजागृती अभियानाची सुरुवात गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथे या महाअभियानाचा शुभारंभ होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य वयात समुपदेशन करून व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे हा आहे.
या मोहिमेत मुंबईतील महानगरपालिका आणि खासगी शाळांतील लाखो विद्यार्थी प्रत्यक्ष तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होऊन ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ची सामूहिक शपथ घेणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने व्यापक तयारी करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
अभियानाच्या तयारीसाठी सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त भिडे यांनी पालक-शिक्षक संघटना, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये हीच सर्वात प्रभावी व्यासपीठे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानात 150 स्वयंसेवी संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालयांतील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, बेस्ट उपक्रम आणि मुंबई मेट्रो प्रशासन सक्रिय सहभाग घेणार आहेत. वरळी येथील मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून व्यसनमुक्तीची शपथ घेतली जाणार असून, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्याचेही सादरीकरण करण्यात येणार आहे.
अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी drugfreemumbai.org या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी आणि शपथ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शपथ पूर्ण केल्यानंतर सहभागी नागरिकांना तात्काळ डिजिटल प्रमाणपत्रही उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील तरुणाईला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी शासन, पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाजाने एकत्र येऊन उभारलेली ही मोहीम राज्यातील सर्वात मोठ्या जनजागृती उपक्रमांपैकी एक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.