मुंबईच्या डबेवाल्यांना महापौर रितू तावडेंचा मोठा दिलासा
वैद्यकीय उपचारांसाठी ₹२५ हजार मदत, सर्व मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही

डबेवाला भवनाचे भाडे माफ करण्यापासून स्वतंत्र सायकल पार्किंगपर्यंत विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका; चर्चगेट येथे ‘डबेवाला टुरिस्ट पॉइंट’ उभारण्याच्या प्रस्तावालाही चालनामुंबई | प्रतिनिधी
मुंबईची ओळख बनलेल्या आणि जगभरात आपल्या अचूक सेवेमुळे व्यवस्थापनाचे आदर्श ठरलेल्या डबेवाल्यांना मुंबई महानगरपालिकेकडून मोठा दिलासा मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रविवारी मुंबई डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीत नोंदणीकृत डबेवाल्यांना वैद्यकीय उपचारांसाठी महापौर वैद्यकीय सहायता निधीतून तातडीने ₹२५ हजारांची मदत देण्याची घोषणा केली. यासोबतच संघटनेने मांडलेल्या सर्व न्याय्य मागण्या नियमांनुसार मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ठोस ग्वाहीही त्यांनी दिली.
महापौर दालनात झालेल्या या बैठकीत आमदार श्रीकांत भारतीय, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सभागृह नेते गणेश खणकर, विविध समित्यांचे अध्यक्ष तसेच डबेवाला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या, “मुंबईचे डबेवाले ही केवळ सेवा नसून मुंबईच्या श्रमसंस्कृतीचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीने जगभरातील व्यवस्थापन संस्थांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविणे ही महानगरपालिकेची सामाजिक जबाबदारी आहे.”
डबेवाला संघटनेने महापौरांकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये वांद्रे येथील डबेवाला भवनाचे भाडे पूर्णपणे माफ करणे, इमारत कायमस्वरूपी निःशुल्क उपलब्ध करून देणे, संस्थापक कै. महादू हावजी बच्चे यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करणे, प्रमुख रेल्वे स्थानकांजवळ सुरक्षित सायकल पार्किंग उभारणे, महापालिका रुग्णालयांत डबेवाल्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच चर्चगेट येथील ऐतिहासिक डबेवाला केंद्राचा ‘मुंबई डबेवाला टुरिस्ट पॉइंट’ म्हणून विकास करणे अशा मागण्यांचा समावेश होता.
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनीही डबेवाल्यांच्या १३० वर्षांच्या परंपरेचा गौरव करत, “वारकरी परंपरेशी जोडलेली ही संघटना मुंबईच्या संस्कृतीचा अभिमान आहे. डबेवाल्यांची पुढील पिढी अधिक सक्षम व्हावी, यासाठी महानगरपालिकेने सर्वतोपरी सहकार्य करावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
महापौरांनी संघटनेच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या महानगरपालिकेच्या नियमानुसार तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने मुंबईच्या हजारो डबेवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.