मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरून २,४९९ मेट्रिक टन कचरा हटवला
भरतीच्या पार्श्वभूमीवर पालिकेची विशेष मोहीम यशस्वी
मुंबई | प्रतिनिधी
मान्सूनमधील मोठ्या भरतीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत अवघ्या ११ दिवसांत २,४९८.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली. ९ ते १९ जुलैदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली होती. १४ ते १८ जुलैदरम्यान समुद्राला ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येण्याचा अंदाज असल्याने किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा हटविण्यासाठी पालिकेने विशेष नियोजन केले होते.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती आणि अन्य घनकचरा हटविण्यासाठी विशेष पथके, यंत्रसामग्री, वाहने आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक १,८२५ मेट्रिक टन कचरा जुहू समुद्रकिनाऱ्यावरून हटविण्यात आला. याशिवाय वेसावे येथून २७७.६० मेट्रिक टन, दादर-माहीम किनाऱ्यावरून १५२.१० मेट्रिक टन, चिंबई-वारिंगपाडा येथून १२७.२० मेट्रिक टन, मढ-मार्वे येथून ४४.२८ मेट्रिक टन, गोराई येथून ३८.८२ मेट्रिक टन आणि गिरगाव चौपाटीवरून ३३.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.
पालिकेने सांगितले की, मान्सून काळात समुद्रातून वाहून येणारा कचरा तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियमित कार्यरत राहणार आहेत. समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
