मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग द्या; गृहभेटी आणि डिजिटायझेशन तातडीने पूर्ण करा : आयुक्त अश्विनी भिडे
पावसामुळे रखडलेल्या SIR मोहिमेला गती देण्याचे निर्देश; अतिरिक्त सुट्यांमध्येही काम करण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी | मुंबई
मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला आता अधिक वेग देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. अलीकडील मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या या मोहिमेची उर्वरित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी मालाड येथील लिबर्टी गार्डन परिसरातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
अश्विनी भिडे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे घरभेटी आणि माहिती संकलनाचे काम काही प्रमाणात प्रभावित झाले. पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता असल्याने गृहभेटी आणि मतदार माहितीच्या डिजिटायझेशनला तातडीने गती देणे आवश्यक आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अभिजीत बांगर यांनीही सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना गणना अर्जांचे वितरण आणि डिजिटायझेशन ही दोन्ही कामे समांतरपणे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भारत निवडणूक आयोगाने या मोहिमेसाठी मुदतवाढ दिली असली, तरी त्याचा विलंबासाठी आधार न मानता आगामी पावसाची शक्यता आणि नियमित प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन आवश्यक असल्यास अतिरिक्त वेळ तसेच सुट्टीच्या दिवशीही काम करून गृहभेटी आणि डिजिटायझेशन पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.