मुंबईतील झाडांची ‘हेल्थ चेकअप’ मोहीम; धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक ओळख, प्रत्येक झाडाचा तयार होणार डेटाबेस
वादळात 15 दिवसांत 830 झाडे कोसळल्यानंतर महापालिकेची मोठी हालचाल; वृक्षतज्ज्ञांसोबत कृती आराखडा, विद्यार्थ्यांकडून होणार सर्वेक्षण

विशेष प्रतिनिधी | मुंबई
मुंबईत अवघ्या 15 दिवसांत 830 झाडे कोसळून अनेक दुर्घटना घडल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता शहरातील प्रत्येक झाडाचे वैज्ञानिक पद्धतीने ‘हेल्थ ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडांचे ‘अतिधोकादायक’, ‘धोकादायक’ आणि ‘सुदृढ’ असे वर्गीकरण करून त्यांच्या वयापासून आरोग्यापर्यंतची सर्व माहिती डिजिटल डेटाबेसमध्ये नोंदविण्यात येणार आहे. यासाठी वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी, वृक्षतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संयुक्त सहभागातून सर्वंकष सर्वेक्षण राबविण्याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जीवनशास्त्रज्ञ, वृक्षतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक तसेच रस्ते, उद्यान, पर्जन्य जलवाहिनी आणि मलनिस्सारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 22 जून ते 6 जुलै 2026 या कालावधीत आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे 830 झाडे कोसळली, त्यापैकी 480 झाडे खासगी जागांवरील होती. याच काळात 1,238 फांद्या तुटल्या, त्यापैकी 709 फांद्या खासगी क्षेत्रातील होत्या. या पार्श्वभूमीवर झाडांच्या सुरक्षिततेबाबत दीर्घकालीन आणि वैज्ञानिक धोरण आखण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
बैठकीत प्रत्येक वॉर्डमध्ये झाडांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्यांचे वय, प्रजाती, आरोग्य, संरचनात्मक स्थिती, आयुर्मान आणि धोक्याची पातळी नोंदविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या माहितीच्या आधारे मुंबईतील प्रत्येक झाडाचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येणार असून, भविष्यात झाडे पडण्याचा धोका आधीच ओळखणे शक्य होणार आहे.
वृक्षसंवर्धन, योग्य छाटणी, झाडांची निगा आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत वृक्षतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली माहिती पुस्तिका तयार करून ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
विकासकामांमुळे तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे शक्यतो मुंबईतच लावावीत, योग्य प्रजातींची निवड करावी, मुळांच्या वाढीसाठी पुरेशी जागा ठेवावी आणि झाडांच्या नैसर्गिक वाढीत अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचनाही तज्ज्ञांनी मांडल्या.
झाडांच्या छाटणीसाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करणे, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याची गरजही बैठकीत व्यक्त करण्यात आली. खासगी क्षेत्रातील झाडांच्या छाटणीसाठीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
झाडे पडण्यामागील खरी कारणे शोधण्यासाठी मातीची गुणवत्ता, मुळांची वाढ, पाण्याचा निचरा, मुळांना मिळणारा श्वास आणि हवामानाचा परिणाम यांचा वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यावरही एकमत झाले. झाड पडल्यावर ते हटविण्यापुरते न थांबता त्यामागील कारणांचे शास्त्रीय विश्लेषण करण्यावर भर देण्यात आला.
मुंबईत ‘बायोडायव्हर्सिटी झोन’ विकसित करणे, स्थानिक प्रजातींची वृक्षलागवड वाढविणे, हवामान बदल लक्षात घेऊन दीर्घकालीन वृक्ष व्यवस्थापन धोरण तयार करणे तसेच योग्य ठिकाणी बांबू लागवड वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
बैठकीत तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, मुंबईतील वृक्षसंपदेचे संरक्षण हे केवळ महापालिकेचे काम नसून त्यासाठी नागरिकांचा सहभाग, जनजागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तितकाच आवश्यक आहे. बैठकीतील सर्व सूचनांचा अभ्यास करून लवकरच टप्प्याटप्प्याने कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
विशेष मुद्दा :
अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी झाडांच्या जमिनीवरील भागासोबतच जमिनीखालील मुळांचाही शास्त्रोक्त अभ्यास करता यावा, यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला. याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार आहे.