Breaking
राजकिय

राज आणि उद्धव ठाकरे युतीत नवा ट्विस्ट

संदीप देशपांडे यांनी घेतली उदय सामंत यांची भेट

0 0 2 1 1 7

प्रतिनिधी मुंबई

12 मे मुंबई,

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली असतानाच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेत, नवा ट्वीस्ट निर्माण केला. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या युतीबाबत संभ्रमाची स्थिती असून युतीची चर्चा फिसकटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे एकत्र येण्याबाबत खलबत सुरू होती. राज यांच्या भूमिकेला उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे युतीच्या चर्चेला बळ मिळाले होते. दोन्ही बाजूने वरिष्ठ स्तरावर युतीबद्दल निर्णय होईल असेही सांगण्यात येत होते. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज यांच्या युतीच्या महत्वपूर्ण निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये यामुळे मोठा उत्साह होता. मात्र महिनाभर चाललेल्या या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सुरुंग लावल्याची चर्चा आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली. मात्र दोघांमध्ये नेमकं काय आणि कोणत्या विषयावर गुप्तगु झाले, हे अद्याप समोर आले नाही.

राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेची ठरली असतानाच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. मात्र, शिंदे बाहेर असल्याने शिवसेना नेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी सामंत यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. मात्र, सर्व घडामोडींवर देशपांडे यांनी खुलासा केला.

नवी मुंबईतील पनवेलच्या फुल बाजारासंदर्भात एक प्रश्न होता, त्यासाठी मंत्री सामंत यांची भेट घेतली. तसेच ठाकरे आणि फडणवीस यांची भेट का झाली, याबाबत काहीही माहिती नाही असे म्हणत दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

 

मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एका कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते. पंरतु, ते दुसऱ्या बैठकीसाठी सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर गेल्याने त्यांनी माझी भेट घेऊन प्रश्न मांडले, मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच राज यांचा एक स्वतंत्र विचार असून, त्यांनी आजवरच्या भेटीतून कोणत्याही अटींना जुमानत नाही हे उद्धव ठाकरेंना दाखवून दिल्याचा टोला सामंत यांनी लगावला. मात्र ,फडणवीस आणि राज यांच्या भेटीवर बोलणे टाळले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे