स्वागताची फुलं, चॉकलेट आणि सोबतीला दप्तर
पहिल्याच दिवशी मिळालेल्या भेटीने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले
१६ जून २०२५_
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींनी उपस्थित राहून वाढवला विद्यार्थ्यांचा उत्साह
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या १६ जून २०२५) पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सजवलेल्या शाळा आणि वर्ग खोल्या, येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प आणि चॉकलेट, ढोल-ताशांचा निनाद, लेझीम नृत्य, पहिल्याच दिवशी नवे कोरे दप्तर, वह्या –पुस्तके व इतर शालोपयोगी वस्तुंची भेट यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने हरखून गेले होते. दमदार पावसाने उल्हासित वातावरणात शाळा प्रवेशोत्सवाचा उपक्रम सर्वत्र उत्साहात साजरा झाला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’ आणि त्याच्या जोडीला शालोपयोगी साहित्य वितरण असा दुहेरी योग साधून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ठिकठिकाणी सोहळ्यांचे आज आयोजन केले होते. या सोहळ्यांना विविध मान्यवरांनीदेखील आवर्जून उपस्थिती लावत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक व पालकांचादेखील उत्साह द्विगुणित केला.
वांद्रे (पश्चिम) स्थित मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पार पडलेल्या शाळा प्रवेशोत्सवास राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी तर वांद्रे (पूर्व) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवली.
एच पश्चिम विभागातील वांद्रे (पश्चिम) स्थित मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पालकमंत्री श्री. शेलार यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि चॉकलेट दिले. विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने संवाद साधून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ढोलताशांचा गजर आणि लेझीम नृत्यासह औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय साहित्याचेही श्री. शेलार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात निवडक विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाचे आभार मानले. या सोहळ्यास उपआयुक्त (परिमंडळ ३ विश्वास मोटे, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त. दिनेश पल्लेवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ उपस्थित होते.
वांद्रे (पूर्व) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत रांगोळी काढण्यात आली होती. तसेच, फुलांनी आणि विविधरंगी फुग्यांनी शाळेची सजावट करण्यात आली होती. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
बोरा बाजार येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवली. डॉ. सैनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शालोपयोगी साहित्याचे वितरणदेखील करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
