मुलुंड क्षेपणभूमीवरील कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावावी
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
विशेष प्रतिनिधी
_दिनांक १२ जून २०२५_

मुंबईतील विविध भागांतून मुलुंड क्षेपणभूमी येथे आणल्या जाणाऱ्या कचऱ्यावर विहित वेळेत योग्य ती प्रक्रिया करुन त्याची तत्काळ विल्हेवाट लावावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक . भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुलुंड क्षेपणभूमी येथील बायो-मायनिंग प्रकल्पास गगराणी यांनी आज (दिनांक १२ जून २०२५ ) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) . किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
मुलुंड क्षेपणभूमीवरील कचरा निष्कासित करुन मूळ जागा पुनर्प्राप्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प राबविला जात आहे. कचऱ्यातील माती, ज्वलनशील पदार्थ तसेच राडारोडा किंवा दगडासारख्या घटकांचे वर्गीकरण करुन त्यावर याठिकाणी प्रक्रिया केली जाते. ऑक्टोबर २०१९ पासून हे प्रकल्प कार्यरत असून याठिकाणी आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.
गगराणी यांनी भेटीदरम्यान मुलुंड क्षेपणभूमीवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामग्रीची पाहणी केली. तसेच, कचऱ्यावरील प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.
****
