मुंबई,७ मे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका दिवाळीनंतर जाहीर होतील. दोन्ही ठाकरे बंधू यावेळी एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल. या पार्श्वभूमीवर महायुती स्वबळावर न लढता एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सत्तेत आल्यानंतर २०१७ चा फॉर्म्युला वापरला जाईल. भाजपकडे त्यावेळी मुख्यमंत्री पद होते. तर शिवसेनेकडे मुंबई महापालिकेत महापौर पद होते. आगामी निवडणुकीनंतर त्याच पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. दरम्यान, भाजपला स्थायी समिती तर शिवसेनेकडे महापौर पद ठेवले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत जाहीर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाकडून तयारी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महापालिका ही महत्वाची महानगरपालिका मानली जाते. मागील २५ वर्षे येथे शिवसेना – भाजपची सत्ता होती. शिवसेनेच्या सत्तेला अनेक राजकीय पक्षांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. भाजपचा देखील यात समावेश होता. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेला केवळ ८४ जागा जिंकता आल्या. तर भाजपने ८२ जागा जिंकून शिवसेनेला आव्हान दिले. दरम्यान, पालिकेत सत्ता राखण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागली. भाजपने त्यावेळी सुरूवातीला पहारेकरी म्हणून नंतर सेनेला बाहेरून पाठिंबा दिला. शिवसेनेचा महापौर त्यामुळे पालिकेच्या शीर्षस्थानी बसला होता. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्रीपद असल्याने शिवसेनेला महापौर पद दिल्याचे बोलले जात होते. आता हाच फॉर्म्युला येत्या निवडणुकीनंतर वापरला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत आहे. मुंबईत आधीच शिवसेनेचे वर्चस्व आहे. अनेक भागात भक्कम बालेकिल्ले आहेत. अशातच शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. अशा स्थितीत स्वबळावर लढणे महायुतीला परवडणार नाही. भाजपने १५० जागांवर दावा केला असला तरी तेवढ्या जागा सध्यस्थितीत देणे योग्य ठरणार नाही. तिन्ही घटक पक्षांकडून जागा वाटपात सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर विचार विनीमय सुरू असल्याचे समजते.
कोट
निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. लवकरच त्या जाहीर होतील. मुंबईत ठाकरेंना आव्हान द्यायचे असेल तर महायुतीला एकत्र लढावे लागेल. परंतु, महायुती मुंबई पालिकेत भगवा फडकवणार. २०१७ चा फॉर्म्युला यावेळी वापरला जाईल. मागील वेळी भाजपकडे मुख्यमंत्री पद होते. तर शिवसेनेकडे मुंबई महापालिकेत महापौर पद होते. यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीत सामील झाली आहे. समिती वाटपात त्यांचाही विचार होईल. परंतु, महापौरपद शिवसेनेकडे तर स्थायी समिती भाजपला दिली जाईल. –
भरत गोगावले, मंत्री तथा शिवसेना नेते
