Breaking
ब्रेकिंग

बीएलओ यांना ईआरओ कार्यालयात कार्यरत ठेवू नका- मुख्य निवडणूक अधिकारी

बीएलओंना निवडणूक कार्यालयात कार्यरत ठेवल्यास कारवाई - जिल्हा निवडणूक अधिकारी  भूषण गगराणी यांचे निर्देश

0 0 2 1 1 7

प्रतिनिधी मुंबई

३ जुलै २०२५

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नेमणूक करण्यात आलेली आहे. हे काम त्यांनी त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सांभाळून ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे. त्यामुळे, एकाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाज सोडून स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात कार्यरत ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) . एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. सन २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने निवडणूक कामकाजात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्राला माननीय भारत निवडणूक आयोगाकडून सन्मानित करण्यात आले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात कार्यरत स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी आणि अन्य निवडणूकविषयक अधिकाऱ्यांची, मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध बाबींसंदर्भात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आज (दिनांक २ जुलै २०२५) बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा) भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (शहर) डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा)  कटियार, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा)  आंचल गोयल, सह मुख्य निवडणूक अधिकारी. मनोहर पारकर, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक). विजय बालमवार यांची उपस्थिती होती.

चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रत्येक बूथ स्तरावर स्वतंत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तथापि, नेमण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आठवड्यातून काही दिवसांसाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) कार्यालयात येण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. तथापि, एकाही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात कार्यरत ठेवू नये. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना अॅपआधारित ऑनलाइन सुविधा पुरविण्यात आल्यामुळे त्यांनीही त्यांच्या मूळ कामकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता निवडणूकविषयक कामकाज करावे. तसेच, संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची त्यांच्या आस्थापना कार्यक्षेत्रातच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नेमणूक करावी. अद्यापही अशी नेमणूक झाली नसल्यास पुढील दोन दिवसांत संबंधितांना त्यांच्या आस्थापना कार्यक्षेत्रात नेमणूक द्यावी, असे निर्देशही  चोक्कलिंगम यांनी दिले. तर, प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे संपूर्ण वर्षभरात सुमारे १०० मतदार यादीशी संबंधित प्रपत्र (फॉर्म्स) येतात. परिणामी, त्यांच्या मूळ कामकाजावर खूप परिणाम होईल, अशी स्थिती निर्माण होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माननीय न्यायालयाचे निर्देश असल्याचे सांगून शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी, असे काही संघटनांचे मत आहे. मात्र, निवडणूक आणि जनगणनेचे कामकाज करणे हे शिक्षकांसाठी अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या इमारती अद्याप रिक्त करण्यात आल्या नाहीत. तसेच, काही ठिकाणी थोड्याच साहित्यासाठी खोल्या बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, सदर साहित्य ठेवण्यासाठी आवश्यक जागेव्यतिरिक्त असलेली जागा किंवा इमारती आठवडाभराच्या आत रिक्त करुन संबंधितांच्या ताब्यात द्याव्यात, असे निर्देशही  चोक्कलिंगम यांनी दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  भूषण गगराणी म्हणाले की, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत आणि त्यांच्या कामकाजाबाबत असलेले गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ आस्थापनेतील कामकाजावर परिणाम न होऊ देता निवडणुकीचे कामकाज करावयाचे आहे. तथापि, त्यांना त्यांचे मूळ कामकाज सोडून आठवड्यातून काही दिवसांसाठीदेखील स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात ठेवू नये. अशी बाब आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असेही  गगराणी यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे