शिवडीतील पदपथ अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा
७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते शेड, २ कट्टे आणि २० फेरीवाल्यांवर कारवाई; ‘पादचारी प्रथम’ अभियानाला वेग

मुंबई : पादचाऱ्यांच्या हक्काचा पदपथ अडवून बसलेल्या अतिक्रमणांवर मुंबई महापालिकेने गुरुवारी जोरदार कारवाई केली. शिवडीतील डी. जी. महाजनी मार्ग आणि जेरबाई वाडिया मार्गालगतच्या पदपथांवरील ७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, २ अनधिकृत कट्टे, ४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. एफ दक्षिण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित पदपथ मोठ्या प्रमाणात मोकळे झाले.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पदपथांवर अडथळा निर्माण करणारे फेरीवाले, अनधिकृत बांधकामे आणि इतर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
एफ दक्षिण विभागाची धडक कारवाई
उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एफ दक्षिण) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. महापालिका पथकाने डी. जी. महाजनी आणि जेरबाई वाडिया मार्गालगतच्या पदपथांची पाहणी करून पादचाऱ्यांच्या मार्गातील अडथळे हटविले. कारवाईदरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

पदपथांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई
पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असून त्यावर दुकाने, शेड, साहित्य किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करून मार्ग रोखू नये, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पदपथांवर अडथळा निर्माण करणारे अनधिकृत बांधकाम किंवा साहित्य आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.