यारी रोड-लोखंडवाला बॅक रोड उड्डाणपूल डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करा
अभिजीत बांगर यांचे निर्देश; ३० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर येण्याची शक्यता

प्रतिनिधी, मुंबई : पश्चिम उपनगरातील यारी रोड, वेसावे आणि लोखंडवाला परिसरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देणाऱ्या यारी रोड-लोखंडवाला बॅक रोड जंक्शन उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. बांगर यांनी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
अंधेरी पश्चिमेतील यारी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शनजवळ, अमरनाथ टॉवर परिसरात हा पूल उभारला जात आहे. कवठे खाडीमुळे प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने खाडीवर पूल उभारून यारी रोड, पंचमार्ग आणि वेसावे परिसराला सरदार वल्लभभाई पटेल नगर, लोखंडवाला संकुल आणि समर्थनगरशी थेट जोडण्याचे नियोजन आहे.
२०६ मीटरचा पूल; वाहतुकीला थेट पर्यायी मार्ग
या पुलाची एकूण लांबी २०६ मीटर असून मुख्य पुलाची लांबी ११० मीटर आणि रुंदी ११ मीटर आहे. सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या बाजूचा ४० मीटर, तर अमरनाथ टॉवरच्या बाजूचा ५६ मीटर जोडमार्ग असेल.
पुलासाठी ‘सिंगल स्पॅन स्टील बास्केट हँडल आर्च’ संरचनेचा वापर करण्यात येणार आहे. पोलादी कमानीला ताणताऱ्यांच्या साहाय्याने पुलाच्या डेक स्लॅबशी जोडण्यात येईल. पुलाच्या अधोरचनेसाठी आरसीसी आधारभिंत आणि आधारमुकुट, तर पायाभरणीसाठी आरसीसी पाइल फाउंडेशनची रचना करण्यात आली आहे.

३० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांवर?
उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वेसावे आणि लगतच्या परिसरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या या परिसरातून प्रवासासाठी लागणारा सुमारे ३० मिनिटांचा कालावधी १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह पूर्व-पश्चिम वाहतूक संपर्क अधिक सक्षम होणार आहे.
सागरी सेतू, कोस्टल रोडशीही जोडणी
आगामी वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (उत्तर) सुरू झाल्यानंतर हा पूल पर्यायी मार्ग म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे यारी रोड, वेसावे, लोखंडवाला आणि परिसरातील नागरिकांसाठी हा पूल केवळ स्थानिक वाहतूक सुविधा न राहता भविष्यातील मोठ्या वाहतूक जाळ्याचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.