सायन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीला वेग १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन;
ऑक्टोबरमध्येच पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश
प्रतिनिधी /मुंबई:
सायन रेल्वे स्थानकाजवळील तब्बल ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आता वेगाने अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचे सर्व काम १५ ऑक्टोबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, निविदेनुसार फेब्रुवारी २०२७पर्यंतची मुदत असतानाही त्यापूर्वीच पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
बांगर यांनी बुधवारी प्रकल्पस्थळाची पाहणी करून रेल्वे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सायन, धारावी, कुर्ला आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गासाठी महत्त्वाचा पूल
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी-२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी सायन स्थानकाजवळील रेल्वे पुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. ११२ वर्षे जुना आणि असुरक्षित ठरलेला पूल बदलण्याचीही आवश्यकता होती.
रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाचे काम मध्य रेल्वेकडून, तर महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्यांचे पुनर्बांधणी व मजबुतीकरणाचे काम महापालिकेच्या पूल विभागाकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून केला जात आहे.
१ हजार टनांच्या दोन पोलादी तुळया
रेल्वे रुळांवर उभारण्यात आलेल्या दोन पोलादी तुळयांच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण अनुक्रमे २१ आणि २९ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. दोन्ही तुळयांवरील अपघात प्रतिबंधक सुरक्षा कठड्यांचे काम तसेच डेक स्लॅबवरील काँक्रिट वेअरिंग कोटचे काम प्रगतिपथावर आहे.
पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) या पोहोच रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्वेकडील काही जागा २५ ऑगस्टपासून महापालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर तेथील पोहोच रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
खांबविरहित ५४.५ मीटरचा पूल
नवीन पूल ५४.५ मीटर लांब आणि २९ मीटर रुंद असून तो एकाच लांब स्पॅनमध्ये उभारण्यात येत आहे. पुलाखाली खांब नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे.
मध्य रेल्वेशी समन्वय साधून उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे. ऑक्टोबरमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे.