पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवा; उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष द्या : प्राजक्ता वर्मा-लवंगारे
रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरा, दुरुस्तीची कामे 'मिशन मोड'वर पूर्ण करण्याचे निर्देश
पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवा; उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष द्या : प्राजक्ता वर्मा-लवंगारे
विशेष प्रतिनिधी | मुंबई
पावसाळ्यात नागरिकांना अखंड आणि प्रभावी आरोग्यसेवा मिळावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोसारख्या पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उच्च जोखमीच्या आणि झोपडपट्टी परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
जोगेश्वरी (पूर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी परिमंडळ-४ मधील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी एस. के. पाटील, एम. डब्ल्यू. देसाई आणि सिद्धार्थ रुग्णालयांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.
वर्मा-लवंगारे यांनी उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देत गृहभेटी, बांधकामस्थळांची तपासणी, साथीच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक मोहिमा आणि उच्च जोखमीच्या भागांचे नियमित सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
रुग्णालयांतील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदी रिक्त पदे तातडीने भरण्याचे, तसेच आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमधील दुरुस्तीची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS), स्वच्छता, भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींचा नियमित आढावा घेण्यावरही त्यांनी भर दिला.
याशिवाय, आरोग्य विभागाशी संबंधित परवाना प्रक्रिया अधिक नागरिकाभिमुख आणि ऑनलाइन करण्याचे, नागरिक सुविधा केंद्रे (CFC) अधिक सक्षम करण्याचे तसेच दफनभूमींची स्वच्छता आणि देखभाल सुधारण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
पावसाळ्यातील वाढत्या आरोग्यविषयक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून जबाबदारीने आणि तत्परतेने काम करा, असा स्पष्ट संदेश प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी आरोग्य यंत्रणेला दिला.