
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेला कशेळी (भिवंडी)-मुलुंड जकात नाका जलबोगदा प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. मुलुंड जकात नाका येथील प्रकल्पस्थळाला भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला.
७.१३ किमी लांबीचा व ४.५ मीटर व्यासाचा हा जलबोगदा सप्टेंबर २०२४ पासून सुरू असून ऑक्टोबर २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुलुंड येथे १३४ मीटर खोलीचा लॉन्चिंग शाफ्ट उभारण्यात आला असून असेंब्ली, टेल आणि ट्यूब टनेलचे उत्खनन पूर्ण झाले आहे. कशेळी येथे १२८ मीटर खोलीच्या रिकव्हरी शाफ्टचे उत्खनन सुरू असून बोगदा खणन यंत्र (TBM) सप्टेंबर २०२६ पासून कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
यावेळी बांगर यांनी तृतीय संस्करण (Tertiary Treatment) केलेले पाणी वाहून नेणाऱ्या जलबोगदा प्रकल्पाचाही आढावा घेतला. घाटकोपर-भांडुप आणि धारावी-घाटकोपर या दोन बोगद्यांची कामे वेगाने सुरू असून भांडुप येथे शाफ्टचे उत्खनन प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाचे बोगदा खणन जानेवारी २०२७ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक व बिगर-पेयजल वापरासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढेल, शुद्ध पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होईल आणि मुंबईच्या जलव्यवस्थापनाला मोठी चालना मिळेल.