मुंबईत स्तन कर्करोग तपासणीचा विक्रम; एका दिवसात 298 केंद्रांवर 27,866 महिलांची तपासणी
एशिया बुक' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद

विशेष प्रतिनिधी | मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या स्तन कर्करोग तपासणी महाअभियानाला मुंबईकर महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मंगळवारी अवघ्या एका दिवसात 298 केंद्रांवर 30 वर्षांवरील 27,866 महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. या विक्रमी उपक्रमाची Asia Book of Records आणि India Book of Recordsमध्ये नोंद झाली असून, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांचा सन्मान करण्यात आला.
महापौर रितू तावडे यांनी महिलांना नियमित आरोग्य तपासणीचे आवाहन करताना सांगितले की, स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. तपासणीत संशयित आढळलेल्या महिलांना पुढील मॅमोग्राफी आणि उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तातडीने पाठविण्यात येणार आहे.
या महाअभियानात महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. शिबिरांमध्ये स्तन कर्करोगाच्या प्राथमिक तपासणीबरोबरच रक्तदाब, वजन आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासण्याही करण्यात आल्या.
महापौरांनी सांगितले की, महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या या अभियानामुळे कर्करोगाविषयी जनजागृती वाढेल आणि हजारो महिलांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल.