Breaking
ब्रेकिंग

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी  महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना प्रायोगिक तत्वावर रंगांचे मोफत वाटप

दहा हजार ८०० लीटर पर्यावरणपूरक रंग उपलब्ध

0 0 2 1 1 7

 

प्रतिनिधी, मुंबई

२ ऑगस्ट २०२५

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना मोफत शाडू माती, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर मूर्ती घडविण्यासाठी मंडपाकरीता जागा अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांमध्ये भर घालत यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे. एकूण सहा पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे. यात ७ हजार ८०० लीटर रंग आणि ३ हजार लीटर इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी या रंगांचा वापर करून श्रीगणरायाच्या मूती्र रंगवाव्यात. जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल.

श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून सेवा-सुविधा करण्याची कार्यवाही केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत.

मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापणा व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच ९९७ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपासाठी जागाही देण्यात आली.

मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग विशेषतः रासायनिक रंग हे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. या शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने मूर्तिकारांना आवाहन केले आहे की, शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा आणि जलाशयांचे प्रदूषण टाळावे.

याच अनुषंगाने महानगरपालिका प्रशासन आता मूर्तिकारांना मूर्ती रंगविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पर्यावरणपूरक रंगही देणार आहे. यामध्ये पांढरा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल असे सहा पर्यावरणपूरक रंग महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये इतर रंगांच्या तुलनेत पांढरा रंग मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक पांढरा प्रायमरही देण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी आपापल्या परिसरातील प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक  प्रशांत सपकाळे यांनी केले आहे. मूर्तिकारांनी या पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सवाला हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

पालिकानामा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 1 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे